काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सध्या जोरदार रणधुमाळी सुरू आहे. आज(शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून वेगवान घडमोडी घडताना दिसत आहेत. आज सकाळपर्यंत अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असणारे दिग्विजय सिंह यांनी या आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे जाहीर केले आहे. तर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे आता या शर्यतीत दाखल झाले आहेत. तर शशी थरूर यांनी सुद्धा आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सध्यातरी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत होणार असल्याचे चित्र आहे.

दिग्विजय सिंह यांनी प्रसारमाध्यामांना माहिती देताना सांगितले की “खर्गे हे माझे वरिष्ठ आहेत. मी काल त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो आणि त्यांना सांगितले की त्यांनी जर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला तर मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. त्यांनी सांगितले होते की ते अर्ज दाखल करणार नाहीत. परंतु नंतर मला प्रसारमाध्यमांमधून समजले की ते उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.”

याचबरोबर “मी त्याला सांगितले की मी त्याच्यांबाजूने उभा आहे आणि त्यांच्याविरुद्ध लढण्याचा विचारही करू शकत नाही. मी त्यांचा प्रस्तावक असेन.” असंही दिग्विजय सिंह यांनी बोलून दाखवलं.

तर “मी आजपर्यंत आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले आहे, करत राहीन. दलित, आदिवासी आणि गरिबांसाठी उभा राहणे, जातीय सलोखा बिघडवणाऱ्यांविरुद्ध लढणे आणि काँग्रेस व नेहरू-गांधी कुटुंबाशी असलेली माझी बांधिलकी या तीन गोष्टींशी मी तडजोड करत नाही. असेही यावेळी दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले.”

Story img Loader