New Video Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये पर्यटकांचा घोळका दिसत असून मागून गोळीबाराचाही आवाज ऐकू येत आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला आणि मुलांसह घाबरलेले पर्यटक स्थानिक टूर ऑपरेटर आणि मार्गदर्शकांसोबत एकत्र बसलेले दिसत आहेत. व्हिडिओमध्ये पर्यटकांचे घाबरलेले आवाज ऐकू येत आहेत, तर स्थानिक लोक हल्लेखोरांपासून लपून राहण्यासाठी त्यांना वाकून राहण्यास सांगत असल्याचे ऐकू येते. गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर हल्ल्याचे असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, त्यापैकी काही व्हिडिओंमध्ये दहशतवादी बंदुका घेऊन पर्यटकांवर गोळीबार करताना दिसत होते.
दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार
पहलगामच्या निसर्गरम्य बैसरन खोऱ्यात हा दहशतवादी हल्ला झाला, जिथे पर्यटक पोनी राईड्स आणि पिकनिकचा आनंद घेत होते. कुरणाच्या सभोवतालच्या पाइन जंगलातून लष्करी पोशाखात बंदूकधारी दहशतवादी बाहेर आले आणि त्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार पुरुष पर्यटकांना वेगळे करण्यात आले, तर काहींनी सांगितलं की धर्म विचारून या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. कलमा येत असणाऱ्या पर्यटकांना सोडून देण्यात आल्याचंही काहीजण म्हणाले.
तर, व्हायरल होत असलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक पर्यटक रोप वेचा आनंद घेत असताना खाली गोळीबार सुरू आहे. इतर पर्यटक सैरावैरा पळत आहेत. त्याच्या हे लक्षात येताच, त्याच्या चेहऱ्यावरचेही हावभाव बदलतात.
दहशतवाद्यांपासून आपला जीव वाचवून पळणाऱ्या पर्यटकांना येथील घोडेस्वारांनी आणि स्थानिकांनी मदत केली. काही व्हिडिओमध्ये तर स्थानिक लोकांनी पर्यटकांना पाठीवर बसवून मुख्य रस्त्यावर आणलं. सुरक्षा दलांना आणि बचाव पथकांना कुरणात पोहोचण्यासाठी बराच वेळ लागला. या रस्त्यावर फक्त पायी जाता येतं, येथून कोणतंही वाहन जाऊ शकत नाही.
भारताने केली पाकिस्तानची कोंडी
या हल्ल्याला भारताने पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. त्यामुळे पाकिस्तानविरोधात भारताने कडक पावलं उचलली आहेत. सिंधू जल करार रद्द करून भारताने पाकिस्तानची पाणीकोंडी केली असून भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसाही अवैध ठरवला आहे. तर, पाकिस्तानात राहणाऱ्या भारतीयांना मायदेशी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला होता. पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या प्रॉक्सी असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने याची जबाबदारी स्वीकारली.