वैज्ञानिकांनी भारत व दक्षिण आफ्रिकेत गांधीलमाश्यांच्या दोन नवीन प्रजाती शोधल्या असून त्यातील एका प्रजातीला हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट याचे नाव देण्यात आले आहे. गांधील माश्यांच्या नव्या प्रजातीचे नाव कोनोब्रेगमा ब्रॅडपिटी असे ठेवले असून या माश्या पतंग व फुलपाखरांच्या अळ्यांवर वाढतात.
या माश्या त्यांच्या यजमानाच्या शरीरात अंडी घालतात व नंतर त्यापासून नवीन माश्या तयार होऊन त्या ममीभूत अळीतून बाहेर पडतात.
या गांधीलमाश्यांचे वर्तन प्राणघातक असले तरी त्या शेतीसाठी फार उपकारक असतात. त्यांच्यामुळे जैवनियंत्रणाची क्रिया साधली जाते.
संतोष श्रीविहार व अवुनजीकट्टू परामबिल रणजिथ या केरळच्या कालिकत विद्यापीठातील दोघांनी माश्यांच्या या प्रजाती शोधल्या आहेत. त्यांनी शोधलेली आणखी दुसरी एक प्रजाती आहे ती परोपजीवीच असून भारतात या प्रजातीतील उपप्रजातीची ही माशी प्रथमच सापली आहे. तिच्या प्रजातीशी जवळ असलेल्या माश्या नेपाळमध्ये आहेत.
नवीन माशीला नाव शोधत असताना थायलंडच्या चुलालोंगकोर्न विद्यापीठातील भूंतिका ए ब्यूटचर यांनी ब्रॅड पीटचे नाव देण्याचे ठरवले. कारण प्रयोगशाळेत अभ्यास करीत असताना त्यांना नेहमी ब्रॅड पीट्स हा अभिनेता म्हणून आवडत असे.
ब्रॅड पीट्सचे नाव असलेली ही माशी २ मि. मी. पेक्षा लहान असून गडद तपकिरी किंवा जवळपास काळ्या रंगाची आहे. तिचे डोके, स्पृशा व पाय तपकिरी पिवळे आहेत.
आतापर्यंतच्या माश्या व ही माशी यांच्यात केवळ चार फरक आहेत. सी. ब्रॅडपिटी ही माशी शोधल्याने माश्यांच्या वर्गीकरणात सुलभता आली आहे. जर्नल झुकीजमध्ये हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.