केंद्र सरकारने भारतीय हवाई दलासाठी नवीन शस्त्र प्रणाली शाखा स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारतीय हवाई दलात नवीन शाखा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे विमान प्रशिक्षणाच्या खर्चात कपात होईल, अशी माहिती हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी दिली.
नवी दिल्लीतील एनसीआर येथे भारतीय वायुसेना दिनानिमित्त परेड आयोजित करण्यात आली होती. तेव्हा एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, “स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशात नवीन शस्त्र प्रणाली शाखा स्थापन करण्यात येणार आहे. या शाखेमुळे विमान प्रशिक्षणाच्या खर्चात कपात होत, ३,४०० कोटी रुपयांची बचत होणार आहे.” या नव्या शाखेच्या माध्यमातून हवाई दलातली सर्व प्रकारची अत्याधुनिक शस्त्रास्त्र प्रणाली हाताळण्यात येणार आहे.
दरम्यान, भारतीय लष्कर आणि नौदलानंतर आता महिलांची अग्निवीर म्हणून भारतीय हवाई दलात भरती केली जाणार आहे. “पुढील वर्षीपासून महिला अग्निवीरांची वायुसेनेत भरती करण्यात येईल,” अशी माहिती एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी दिली आहे.