New Year 2024 Celebration : न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जपान, थायलंड, चीन आणि मंगोलियापाठोपाठ भारतातही नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अनेक ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळल्याचं पाहायला मिळालं. मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी एकत्र येत नवीन वर्षाचं स्वागत केलं आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस, गोव्यातलया अनेक समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक आणि नागरिकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. ३१ डिसेंबरच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटे आणि ५० सेकंद झाल्यावर लोकांनी सेकंद मोजायला सुरुवात केली आणि ठीक १२ वाजता एकच जल्लोष केला.
दरम्यान, सात तासांपूर्वी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातल्या नागरिकांनी नवीन वर्षाचं दणक्यात स्वागत केलं. न्यूझीलंडमधील पूर्वेकडील प्रसिद्ध शहर ऑकलंडमधील लोकांनी सर्वात आधी नववर्षाचा जल्लोष केला. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात आतषबाजी करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. ऑस्ट्रेलियातील सिडनी हार्बर पूलावर मोठी आतषबाजी करण्यात आली. येथे भव्यदिव्य लाईट शोचं आयोजन करण्यात आलं होतं. जगभरातल्या कोट्यवधी लोकांनी टीव्ही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा जल्लोष पाहिला.
हे ही वाचा >> Happy New Year 2024 Wishes: नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीतील खास Whatsapp Messages, Quotes, SMS, Status
नववर्ष साजरं करण्याचा पहिला मान कोणाला?
ओशनिया खंड ज्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी आणि पापुआ न्यू गिनी यासारखे बेटांचे देश आहेत येथे नवीन वर्षाचे प्रथम स्वागत केले जाते. किरिबाटी मधील किरितीमाती बेट हे नवीन वर्ष साजरे करणारे पहिले ठिकाण आहे. येथे १ जानेवारी सुरु झालं तेव्हा भारतात ३१ डिसेंबरच्या दुपारी ३.३० वाजले होते. टोंगा, सामोआ आणि किरिबाटी यांनी प्रथम नवीन वर्षाचे स्वागत केले, त्यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.