एपी, बीजिंग : चीन सरकारने आपले कठोर ‘शून्य कोविड धोरण’ हटवल्यानंतर रविवारी चीनी नागरिकांनी चांद्र नववर्ष उत्साहात साजरे केले. यावेळी प्रार्थनास्थळांत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. करोना महासाथीमुळे गेल्या तीन वर्षांपासून साजरा न झालेला हा सण यंदा मोठय़ा प्रमाणावर होत आहे.
विशेष म्हणजे चांद्र नववर्षांरंभानिमित्त चीनमध्ये वार्षिक सुट्टी दिली जाते. चीनमध्ये साजरे होणाऱ्या या नवीन वर्षांत, प्रत्येक वर्षांचे नाव चिनी राशीच्या बारा चिन्हांनुसार ठेवले जाते. हे ‘सशाचे वर्ष’ आहे. चीनच्या बहुतेक भागांमध्ये करोना प्रतिबंध शिथिल केल्यानंतर टाळेबंदी आणि प्रवासबंदीची चिंता नसल्याने अनेक जण त्यांच्या आप्त-स्वकीय आणि कुटुंबीयांना पुन्हा भेटण्यासाठी त्यांच्या गावी रवाना झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी राजधानी बीजिंगमध्ये मोठय़ा प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. या उत्सवानिमित्त चीनमध्ये सार्वजनिकरित्या साजरा केल्या जाणाऱ्या वसंतोत्सवाचे पुनरागमन झाले आहे .
बीजिंगमध्ये, अनेक भाविकांनी लामा मंदिरात प्रात:कालीन प्रार्थना केली. परंतु महासाथीच्या आधीच्या दिवसांपेक्षा गर्दी कमी होती. तिबेटी बौद्ध संकेतस्थळाने सुरक्षेच्या कारणास्तव या मंदिरात प्रतिदिनी ६० हजार जणांना परवानगी दिली आहे. त्यासाठी आगाऊ आरक्षण आवश्यक आहे. दरम्यान नवीन वर्षांसाठी टैओरेंटिंग पार्क पारंपारिक चिनी कंदिलांनी सजवलेले असूनही खाद्यपदार्थाच्या दुकानांतील उलाढाल सामान्य स्थितीत सुरू नाही. याशिवाय, बदाचू पार्क येथील लोकप्रिय मंदिराची जत्रा या आठवडय़ात परत सुरू होणार आहे. परंतु डिटान पार्क आणि लॉन्गटन लेक पार्कमध्ये अद्याप पूर्ववत उत्सवाची प्रतीक्षा आहे. हाँगकाँगमधील वर्षांतील पहिली अगरबत्ती लावण्याच्या लोकप्रिय विधीसाठी शहरातील सर्वात मोठे ताओवादी मंदिर असलेल्या वोंग ताई सिन मंदिरात भाविकांची झुंबड उडाली होती. महासाथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा लोकप्रिय विधी स्थगित करण्यात आला होता.
‘पुन्हा प्रादुर्भावाची शक्यता’
चीनच्या ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’चे मुख्य महासाथ तज्ज्ञ वू जुनयू यांनी चीनी समाजमाध्यम ‘वीबो’वर चिंता व्यक्त केली, की एवढय़ा मोठय़ा संख्येने नागरिकांच्या सार्वजनिक वावरामुळे काही भागात करोना साथीचा प्रसार होऊ शकतो. परंतु पुढील दोन-तीन महिन्यांत करोनाबाधितांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाही. कारण अलीकडील लाटेत देशातील १.४ अब्ज लोकसंख्येपैकी सुमारे ८० टक्के लोकांना करोना संसर्ग झाला होता.