नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण जग तयार झाले आहे. यंदा वर्षअखेरीस सलग सुट्ट्या जोडून आल्यामुळे अनेकांचा उत्साह शिगेला पोहोचला. शनिवार पासूनच अनेक ठिकाणी नववर्षाचे स्वागत सुरू झाले. बंगळुरूमध्ये अशीच एक पार्टी सुरू असताना धक्कादायक अशी बाब घडली. २७ वर्षीय दिपांशू शर्मा हा सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूण नववर्षाची पार्टी केल्यानंतर इमारतीच्या ३३ व्या मजल्यावरून खाली पडला. बंगळुरू पूर्व येथे केआर पुरा भागातील भट्टरहळ्ळी परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये दिपांशू गेला होता. यावेळी ३३ व्या मजल्यावर असलेल्या घरातील खिडकीमध्ये सिगारेट विझवत असताना तोल जाऊन दिपांशू खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
दिपांशू मुळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी असून सध्या तो कोडीगहळ्ळी (केआर पुरा) येथे राहत होता. त्याचे वडील भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले आहेत. ते कुटुंबियांसह उत्तर प्रदेशमध्ये राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गुरुवारी रात्री दिपांशू आणि त्याचे तीन मित्र त्यांच्या मैत्रीणीच्या घरी पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर सर्वजण व्हाईटफिल्ड मॉलमध्ये चित्रपट पाहायला गेले. मात्र चित्रपट आधीच सुरू झाला असल्यामुळे इंदिरानगर भागातील पबमध्ये गेले. तिथून पार्टी करून ते मध्यरात्री अडीच वाजता मित्राच्या फ्लॅटवर पोहोचले. दिपांशूचे मित्र बेडरुमध्ये झोपलेले असताना दिपांशू हॉलमध्येच झोपला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
यावेळी हॉलच्या खिडकीत रात्री सिगारेट विझवत असताना तोल जाऊन तो थेट खाली कोसळला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.