न्यूझीलंडमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध पाळले जात आहेत. अनेक ठिकाणी हॉटेल आणि कॅफे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. करोनाच्या प्रादुर्भावावर आळा घालण्यात न्यूझीलंडचा चांगलेच यश आले आहेत. त्यानंतर मागील दोन आठवड्यांपासून देशामधील एक एक सेवा हळूहळू सुरु करण्यात येत आहे. त्यातच आता पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासंदर्भात वेगवेगळ्या योजना तयार केल्याची माहिती नुकत्याच एका फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून देशातील नागरिकांना दिली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक योजनांबद्दल आणि शक्यतांबद्दल भाष्य केलं. यामध्ये त्यांनी देशामधील कंपन्यांनी चार दिवसांचा आठडा ठेवण्यासंदर्भात विचार करावा असंही म्हटलं आहे. पर्यटन हा प्रमुख व्यवसाय असलेल्या न्यूझीलंडमधील कंपन्यांनी चार दिवसांच्या आठवड्यांचा गांभीर्याने विचार करायला हवा. यामुळे येथील स्थानिक पर्यटनाला आणि त्यासंबंधित उद्योगांना हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होईल अशी अपेक्षा आर्डेन यांनी व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चार दिवसांचा आठवडा केल्याने काम आणि खासगी आयुष्य दोन्ही संभाळणे अधिक सोपे जाईल असं मतही आर्डेन यांनी व्यक्त केलं. देशांतर्गत पर्यटन वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात सरकारकडे अनेकांनी अनेक सल्ले दिले असल्याची माहिती आर्डेन यांनी फेसबुक लाइव्हमध्ये दिली. अगदी चार दिवसांचा आठवडा करण्यापासून सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या वाढवण्यापर्यंतचे सल्ले आपल्याला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. करोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे परदेशी पर्यटक येणे शक्य नसले तरी देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासंदर्भात पावले उचलण्यास न्यूझीलंडने सुरुवात केली आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यूझीलंडने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या आहेत. हवाई वाहतुकीवर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. मात्र पर्यटन हा न्यूझीलंडमधील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे. २०१६ च्या आकडेवारीनुसार देशाच्या जीडीपीच्या ५.६ टक्के वाटा हा पर्यटन व्यवसायाचा आहे. त्यामुळेच लोकांनी देशांतर्गत पर्यटनाला सुरुवात करावी या हेतूने एकीकडे कार्यालये सुरु करतानाच लोकांना फिरण्यासाठी जास्त वेळ मिळावा आणि पर्यटन व्यवसाय थोड्याफार प्रमाणात तरी पूर्ववत व्हावा यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत.

नक्की वाचा >> नियम म्हणजे नियम… सरकारी नियमांमुळे पंतप्रधानांनाच कॅफेमध्ये नाकारला प्रवेश

अर्थात चार दिवसांचा आठवडा ठेवावा की नाही हा पूर्णपणे कंपनी आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चर्चेमधून घेण्याचा निर्णय असल्याचेही आर्डेन यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी करोनाच्या साथीमुळे घरुन काम करणेही आणि चांगल्या दर्जाचे काम करणे शक्य असल्याचे आपल्याला पहायला मिळालं असल्याच्या मुद्द्यावर जोर देत एक प्रकारे चार दिवसांच्या आठवड्याच्या अंमलबाजवणीला पाठिंबाच दर्शवला आहे. “तुमची कंपनी असेल तर तुम्ही नक्कीच यासंदर्भात विचार करावा असं माझं म्हणणं आहे. हे तुमच्या कंपनीला कसे फायद्याचे होईल याबद्दल विचार करा पण यामुळे देशातील पर्यटन वाढण्यास नक्कीच मदत होईल,” असं मत आर्डेन यांनी फेसबुक लाइव्हमध्ये बोलताना व्यक्त केलं.

मात्र खरोखर न्यूझीलंडने चार दिवसांचा कार्यलयीन आठवडा केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. जगभरात याआधी काही देशांमधील काही बड्या कंपन्यांनी हा प्रयोग करुन पाहिला होता तेव्हा त्यांना कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात केली होती. मात्र आता न्यूझीलंडमधील कंपन्या यासंदर्भात काय निर्णय घेतात हे येणाऱ्या काही काळामध्ये स्पष्ट होईल. मात्र करोनाच्या भितीमधून बाहेर पडत अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशांना न्यूझीलंडने समोर ठेवलेल्या या पर्यायाचा विचार करता येईल हे मात्र नक्की.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand pm jacinda ardern floats 4 day working week plan to let people travel more and boost economy scsg