न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच यापुढं निवडणूक लढणार नसल्याचंही अर्डर्न यांनी जाहीर केलं आहे. गुरुवारी पक्षाची कॉकस बैठक पार पडली. या बैठकीत ७ फेब्रुवारीपर्यंत राजीनामा देणार असल्याचं अर्डर्न यांनी सांगितलं. यामुळे सर्वांनाच एक धक्का बसला.
न्यूझीलंडमध्ये ऑक्टोंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. गुरुवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत अर्डर्न यांनी म्हटलं की, “आता ती वेळ आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी विचार केली की, माझ्याकडं देशाचं नेतृत्व करण्याची शक्ती आहे का? पण मला याचं उत्तर नाही मिळालं. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.”
हेही वाचा : उदारमतवाद-सर्वसमावेशकतेचे यश..
“पंतप्रधान म्हणून साडेपाच वर्षे खडतर होती. पण, राजकीय नेता देखील शेवटी माणूसच आहे. जोपर्यंत आमच्यावर जबाबदारी होती, ती चोख पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आम्ही केल्या. खरा नेता तो आहे, ज्याला पद सोडण्याची योग्य वेळ माहिती असते. मात्र, याचा अर्थ मी कमकुवत आहे, असा मुळीच नाही,” असं अर्डर्न यांनी सांगितलं.
हेही वाचा : स्त्री राजकारण्यांसाठीचा ‘जेसिंडा पॅटर्न’!
सर्वात तरुण पंतप्रधान
२०१७ साली जेसिंडा अर्डर्न या सर्वात तरुण महिला पंतप्रधान बनल्या. करोना महामारी, दोन मस्जिदींवर दहशतवादी हल्ला, ज्वालामुखी विस्फोट अशा खडतर काळातही न्यूझीलंडचं नेतृत्व जेसिंडा अर्डर्न यांनी केलं आहे.