जगभरात करोनाच्या संकटाचं थैमान सुरू आहे. गेल्या दीड वर्षापासून करोनाचा विषाणू जगभरात ठाण मांडून बसला आहे. व्यापक लसीकरण मोहिमेनंतर देखील करोनाचे रुग्ण वाढणं काही थांबत नसताना एक देश असा होता, जिथे गेल्या सहा महिन्यांत एकही नवा करोनाबाधित सापडला नव्हता. मात्र, आज तिथे तब्बल सहा महिन्यांनंतर पहिला करोनाबाधित सापडला. याचा धसका या देशानं घेतला आणि आख्ख्या देशात कठोर लॉकडाउनची घोषणा करून टाकली. हा करोनाबाधित डेल्टा व्हेरिएंटचा असावा अशी भिती इथल्या सरकारला वाटत असून संभाव्य गंभीर परिणाम टाळण्यासाठी तातडीने लॉकडाउन लागू करण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

ज्या देशानं एका नव्या करोनाबाधितामुळे कठोर लॉकडाउनची घोषणा केली, तो देश आहे न्यूझीलंड! न्यूझीलंडमध्ये गेल्या ६ महिन्यांपासून एकही नवा करोनाबाधित सापडला नव्हता. जगभरात सर्वात आधी करोनामुक्त होणारा देश देखील न्यूझीलंडच होता. त्यामुळे या देशात निर्बंध उठवण्यात आले होते. सर्व व्यवहार देखील सुरळीत पद्धतीने सुरू होते. मात्र, न्यूझीलंडमधील सर्वात मोठ शहर असलेल्या ऑकलंडमध्ये हा करोनाबाधित सापडल्यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या. पण हा करोनाबाधित डेल्टा या वेगाने संसर्ग होणाऱ्या प्रकाराने बाधित झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवताच प्रशासनाची झोप उडाली. पाठोपाठ न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डर्न यांनी कठोर लॉकडाउनची घोषणा केली.

शाळा, उद्योगधंदे पूर्णपणे बंद

लॉकडाउनच्या घोषणेनुसार, संपूर्ण न्यूझीलंडमध्ये चौथ्या टप्प्याचा अर्थात कठोर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस हा लॉकडाउन लागू असेल. ज्या ठिकाणी संबंधित करोनाबाधित आढळला, त्या ऑकलंड या किनारी शहरामध्ये तब्बल ७ दिवस हा लॉकडाउन लागू असेल. शाळा, कार्यालये, उद्योगधंदे या काळामध्ये पूर्णपणे बंद असतील. फक्त जीवनावश्यक सेवाच फक्त सुरू राहतील. अचाकन लागू करण्यात आलेल्या या लॉकडाउनमुळे सामान्यांची मात्र बाजारात धावपळ दिसायला लागली आहे.

‘करोनासोबत जगा’ धोरण आम्हाला स्वीकारता येणार नाही; करोनामुळे २६ मृत्यू झालेल्या देशाची भूमिका

…म्हणून लावला लॉकडाउन!

या निर्णयाविषयी विचारणा केली असता पंतप्रधान जेसिंडा म्हणाल्या, “या संकटातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडण्यासाठी आपण सगळ्याच चांगली कुठली गोष्ट करू शकतो, तर ती कठोर लॉकडाउन आहे. कठोर निर्बंधांनी सुरुवात करून नंतर ते कमी करणं हे कमी निर्बंध लागू करून व्हायरसला मोकळीक देत त्याला वाढताना बघण्यापेक्षा चांगलं आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आला”, अशी माहिती पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी दिली आहे.

काय सांगते आकडेवारी?

याआधी न्यूझीलंडमध्ये थेट फेब्रुवारीमध्ये नवा करोनाबाधित सापडला होता. त्यामुळे संपूर्ण देशात निर्बंध उठवण्यात आले होते. फक्त देशाच्या सीमारेषांवर बाहेरुन येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध घालणयात आले होते. आत्तापर्यंत न्यूझीलंडमध्ये एकूण २ हजार ५०० करोनाबाधितांची नोंद झाली असून २६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Story img Loader