पीटीआय, माले/नवी दिल्ली
मालदीवचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहमद मुइझ्झू यांनी शनिवारी भारतीय लष्कराचे त्या देशात असलेले जवान परत बोलाविण्याचे औपचारिक निर्देश दिले. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मालदीवची राजधानी माले येथे मुइझ्झू यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या कार्यालयाने याबाबत माहिती दिली. तर जवानांना परत बोलाविण्याबाबत ‘चर्चेतून तोडगा’ काढण्याचे ठरल्याचा दावा केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
मुइझ्झू यांनी सप्टेंबरमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला होता. भारतीय जवानांची पाठवणी करण्याच्या आश्वासनावर मतदारांनी आपल्याला कौल दिला असल्याचे मुइझ्झू यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांनी मालदीवचे आठवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. या शपथविधीला भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते. शपथविधीनंतर २४ तासांच्या आत, शनिवारी झालेल्या भेटीत मुइझ्झू यांनी लष्कर परत बोलाविण्याची औपचारिक विनंती करून भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाला धक्का दिल्याचे मानले जात आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांचे मुइझ्झू हे निकटचे सहकारी आहेत. यामीन यांनीच २०१३ ते २०१८ या काळात चीनबरोबर संबंध अधिक दृढ केले असल्याने मुइझ्झूदेखील त्याच वाटेने जातील असे मानले जात आहे. मालदिव हा हिंदी महासागर प्रदेशातील मोक्याचे ठिकाण असलेला भारताचा प्रमुख सागरी शेजारी देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सागरमाला’ आणि ‘नेबरहूड फस्र्ट पॉलिसी’ या संकल्पनेमध्ये मालदीवला विशेष स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा >>>‘डिपफेक’बाबत समाज माध्यमांबरोबर लवकरच चर्चा
चर्चेतून तोडग्याची भारताची भूमिका
मुइझ्झू यांनी रिजिजूंबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान भारतीय जवानांच्या वापसीचा मुद्दा काढल्याचे भारतीय परराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांनी मान्य केले. हे जवान तेथे वैद्यकीय मदत आणि अमलीपदार्थ तस्करी रोखण्याच्या कामात वैमानिक म्हणून जबाबदारी पार पाडत असल्याबद्दल मुइझ्झू यांनी समाधान व्यक्त केल्याचा दावाही या अधिकाऱ्यांनी केला. त्याच वेळी जवानांना परत बोलाविण्यासंदर्भात चर्चेतून तोडगा काढण्याचे दोन्ही देशांनी मान्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.