छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एक नवविवाहित जोडपं आपल्या राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळलं आहे. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी हा खळबळजनक प्रकार घडला आहे. घरात रिसेप्शनची तयारी सुरू असताना नवविवाहित जोडपं आपल्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळलं आहे. हा प्रकार उघकीस आल्यानंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्राथमिक माहितीच्या आधारे तपास केला जात आहे. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर स्वत:वरही वार केले, यातच दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी संध्याकाळी उशिरा टिक्रापारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्रिजनगर येथे ही घटना घडली. याबाबतचं वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम (वय- २४) आणि काहकाशा बानो (वय-२२) यांचं रविवारी लग्न झालं होतं. मंगळवारी रात्री त्यांच्या लग्नाचं रिसेप्शन होणार होते. या कार्यक्रमासाठी तयार होण्यासाठी दोघंही आपल्या खोलीत गेले होते. यावेळी वराच्या आईने वधूच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण खोलीचा दरवाजा आतून बंद होता. वराच्या आईने दोघांनाही हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. घटनेचं गांभीर्य लक्षात येताच कुटुंबातील सदस्यांनी खिडकीतून डोकावलं. तेव्हा दोघंही रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली.