चौथ्या मजल्यावरच्या फ्लॅटमधून खाली पडून एका न्यूज अँकरचा मृत्यू झाला. राधिका कौशिक असे मृत महिलेचे नाव आहे. ती झी राजस्थानमध्ये नोकरीला होती. नोएडा सेक्टर ७७ मधील अंतरीक्ष फॉरेस्ट अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शु्क्रवारी पहाटे ३.३० च्या सुमारास पार्टी सुरु असताना ही दुर्देवी घटना घडली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

राधिका कौशिक मूळची जयपूरची असून ती मागच्या चार महिन्यांपासून नोएडामध्ये राहत होती. इमारतीच्या सुरक्षारक्षकाने फोन करुन कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटना घडली त्यावेळी राधिका कौशिकच्या घरामध्ये पार्टी सुरु होती. पोलिसांना घरामध्ये दारुच्या बाटल्याही सापडल्या.

कौशिक बरोबर काम करणारा सह अँकर राहुल अवस्थी सुद्धा त्यावेळी फ्लॅटमध्ये उपस्थित होता असे पोलिसांनी सांगितले. राधिकासह आणखी दोन जण या फ्लॅटमध्ये राहतात. पण राधिकाच्या मृत्यूच्यावेळी ते घरामध्ये नव्हते. राधिका आणि तिचा सह अँकर दारुच्या नशेमध्ये असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

दोघांमध्ये वादावादी सुद्धा झाली. अवस्थीने सांगितले की, जेव्हा मी बाथरुममध्ये गेलो त्यावेळी कौशिक खाली पडली. हा निव्वळ अपघात होता, हत्या होती की अँकरन आत्महत्या केली ते निश्चित करण्यासाठी पोलीस आता तपास करत आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पोलीस राहुल अवस्थीची चौकशी करत आहेत.

 

 

Story img Loader