नवी दिल्ली : ‘न्यूजक्लिक’ या वृत्त संकेतस्थळाचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केल्याची माहिती सूत्रांनी सोमवारी दिली. चक्रवर्ती यांनी दिल्ली न्यायालयात त्यासाठी परवानगी मागितली आहे. ‘न्यूजक्लिक’ने परदेशातून निधी घेऊन चीनच्या समर्थनार्थ दुष्प्रचार केल्याचा आरोप ठेवत, दिल्ली पोलिसांनी संस्थापक-संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि चक्रवर्ती यांच्याविरोधात ‘यूएपीए’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>> कोठडी मृत्यूप्रकरणी कारवाई; पूंछ हत्याकांडाची लष्कराकडून चौकशी, ब्रिगेडियरची बदली
चक्रवर्ती यांनी विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्याकडे गेल्या आठवड्यात अर्ज करून या प्रकरणी माफीची विनंती केली. आपल्याकडे यासंबंधी काही सामग्री असून ती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांना द्यायची असल्याचे त्यांनी या अर्जामध्ये नमूद केले आहे. चक्रवर्ती यांचा जबाब नोंदवण्यासाठी न्यायाधीशांनी दंडाधिकारी न्यायालयासमोर हे प्रकरण सोपवले आहे. त्यांचा जबाब पडताळून पाहिल्यानंतर त्यांचा अर्ज मंजूर करायचा की नाही याबद्दल निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली