काही दिवसांपूर्वी भास्कर समूहाच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यावरून मोठ्या प्रमाणात टीका देखील आयकर विभागावर करण्यात आली होती. सत्ताधारी आयकर विभागाचा वापर करून घेत असल्याची देखील टीका विरोधकांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आयटी विभागाने दोन वृत्त समूहांच्या कार्यालयांमध्ये जाऊन दिवसभर चौकशी केली आहे. न्यूजलाँड्री आणि न्यूजक्लिक या दोन वृत्त संकेतस्थळांच्या दिल्लीमधील कार्यालयांमध्ये आयटी विभागाने चौकशी केली आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेला धाड किंवा छापा असं न म्हणता ‘सर्व्हे’ असं नाव देण्यात आलं आहे. कथित करचोरी प्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं आयकर विभागाकडून इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगण्यात आलं आहे.
‘सर्व्हे’ नेमका काय प्रकार आहे?
करचोरी किंवा कर चुकवेगिरी अशा कोणत्याही प्रकरणात चौकशी करण्यासाठी आयकर विभागाला संबंधितांच्या घरी, कार्यायात, दुकानात, कारखान्यांमध्ये छापे टाकण्याचे, शोध घेण्याचे किंवा मालमत्ता ताब्यात घेण्याचे अधिकार आहेत. तप आयकर कायद्याच्या कलम १३३ अ मध्ये ‘सर्व्हे’ची तरतूद करण्यात आली आहे. हे ‘सर्व्हे’ फक्त व्यावसायिक ठिकाणीच घेता येतात. सर्व्हे फक्त कार्यालयीन वेळेमध्येच सुरू होऊ शकतात, तर शोध किंवा छापे हे दिवसाच्या कोणत्याही वेळी करता येऊ शकतात. या सर्व्हेदरम्यान, आयकर विभागाचे अधिकारी खातेवही, बँक खात्याचे तपशील, अकाउंट स्टेटमेंट, रोकड, शेअर्स अशा गोष्टींशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करतात.
याआधी ३० जून रोजी देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही संकेतस्थळांच्या कार्यालयांना भेट दिली होती. त्यावेळी या कार्यालयांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज दिल्लीच्या सर्वोदय एनक्लेव्ह परिसरातील कार्यालयात आयकर विभागांनी सर्व्हेसाठी हजेरी लावली. सकाळी ११.३० च्या सुमारास सुरू झालेली तपासणी संध्याकाळपर्यंत सुरू होती. मधू त्रेहान आणि अभिनंदन सेखरी हे न्यूजलाँड्रीचे सीईओ आहेत.
तर दुसरीकडे सैदुलजब परिसरातील न्यूजक्लिकच्या कार्यालयात सकाळच्या सुमारास आयकर विभागाचे सात ते आठ अधिकारी पोहोचले. तिथेही तपासणी केल्यानंतर न्यूजक्लिकचे मुख्य संपादक प्रबिर पूरकायस्थ यांना चौकशीसाठी समन्स देखील बजावण्यात आले आहेत.