पीटीआय, नवी दिल्ली : जानेवारीत भारतात करोना प्रादुर्भावात वाढ होण्याची शक्यता असल्याने पुढील ४० दिवस महत्त्वाचे असतील, असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिला. करोना महासाथीची लाट आली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याचे प्रमाण खूपच कमी असेल. तसेच मृत्यूचेही प्रमाण कमी असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या लाटेत पूर्व आशियात मोठय़ा प्रमाणावर करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ३०-३५ दिवसांनी भारतात नवीन लाट आली होती. हा कल लक्षात घेऊन सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. सूत्रांनी सांगितले की, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूर येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘एअर सुविधा’ अर्ज भरणे आणि ७२ तास आधी ‘आरटी-पीसीआर’ चाचणी सक्तीची होऊ शकते. गेल्या दोन दिवसांत भारतात आलेल्या सहा हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोविड-१९ साठीची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३९ जण करोनाबाधित आढळले. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया दिल्ली विमानतळाला भेट देऊन करोना चाचणी सुविधांचा आढावा घेतील. मंडाविया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना करोना प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करता येत नसल्यास भारत जोडो यात्रा स्थगित करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक नियमावली कडक करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. ‘भारत जोडो यात्रे’ची सध्या हिवाळी सुट्टी सुरू आहे. ३ जानेवारीपासून ही यात्रा पुन्हा सुरू होईल.
हेही वाचा – देशभरात करोना उपचारांची सज्जता; विविध राज्यांतील रुग्णालयांत सराव
सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना कोणत्याही अनपेक्षित स्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारने शनिवारपासून करोना प्रतिबंधासाठी प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानातून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची स्वैर (रँडम) चाचणी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी व आरोग्यमंत्री मंडाविया यांनी या संदर्भातील तयारीच्या आढावा बैठका घेतल्या आहेत. मंगळवारी देशभरातील रुग्णालयांत करोनासंदर्भातील तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी सराव प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) घेण्यात आली.