उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजपानेही निवडणुकीसाठी रणनिती आखली आहे. मात्र असं असलं तरी पक्षांतर्गत कुरबुरीमुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर भाजपातील एक गट नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यात उत्तर प्रदेशमधील भाजपा नेते आणि मंत्री स्वामी प्रसाद मौर्या यांच्या विधानामुळे बळ मिळालं आहे. पुढच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय विधानसभा निवडणुकीनंतर केला जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश भाजपात सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. भाजपामध्येही बंडखोरीचं चिन्हं दिसत आहेत.
दुसरीकडे उत्तर प्रदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असं स्पष्ट केलं आहे. “राज्यातून भ्रष्टाचार, गुंडगिरी हद्दपार झाली असून राज्याचा विकास होत आहे. आम्ही पुढची निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लढवू”, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी सांगितलं. तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी या उलट विधान केलं आहे. उत्तर प्रदेशात कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवायच्या याबाबत दिल्लीतील पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल, असं त्यांनी सांगितलं.
ज्योतिरादित्य शिंदेंच्या सुरक्षेत मोठा गोंधळ; १४ पोलीस कर्मचारी निलंबित
यावर उत्तर प्रदेश भाजपा प्रवक्त्यांनी सारवासारव करत स्पष्टीकरण दिलं आहे. “स्वतंत्र देव हे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी काय सांगितलं हे महत्त्वाचं आहे. केशव प्रसाद मौर्या आणि स्वामी प्रसाद मौर्या हे पक्षाच्या ध्येय धोरणांबाबत सांगत आहे”, असं स्पष्टीकरण भाजपा प्रवक्ते हरिश्चंद्र श्रीवास्तव यांनी सांगितलं.
पश्चिम बंगाल : भाजपा जिल्हाध्यक्षासह अन्य नेत्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
भाजपामध्ये बंडाची चिन्हे दिसू लागताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू माजी सनदी अधिकारी ए. के. शर्मा यांच्यावर राज्यात पक्षाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. शर्मा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटस्थ मानले जातात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी या नेमणुकीची घोषणा केली. अधिकृत निवेदनाद्वारे सिंह यांनी लखनऊ येथील अर्चना मिश्रा व बुलंदशहरचे अमित वाल्मिकी यांची प्रदेश सचिव म्हणून नेमणूक केल्याचेही जाहीर केले.