Next Delhi CM Official Residence: दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, अजूनही दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार? याबाबत निर्णय झाला नसल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर असून ते भारतात परतल्यानंतरच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण येणार? याची जशी चर्चा सध्या चालू आहे, तशीच चर्चा ही व्यक्ती कुठे राहणार? याचीही आहे. कारण दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या बंगल्याला ‘शीशमहल’ म्हणत हा भाजपानं केजरीवाल यांच्याविरोधात प्रचाराचा मोठा मुद्दा केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान अर्थात ६, फ्लॅगस्टाफ रोड दिल्ली विधानसभा निवडणूक काळात विशेष चर्चेत राहिलं. पण ते इथल्या राजकीय घडामोडींमुळे नसून या बंगल्यातील आलिशान सुविधांमुळे! भारतीय जनता पक्षानं या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षाला चांगलंच घेरलं होतं. दिल्लीकरांच्या पैशांमधून अरविंद केजरीवाल यांनी स्वत:साठी हा शीशमहल बांधून घेतल्याची टीकाही केली गेली. आता हाच शीशमहल ओस पडण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीचे भावी मुख्यमंत्री या बंगल्यात राहणार नसल्याचं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान ओस पडणार!

दिल्लीतील ६, फ्लॅगस्टाफ रोड या निवासस्थानी पुढचे मुख्यमंत्री राहणार नाहीत, असं दिल्ली भाजपाचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना कळवलं आहे. शिवाय, या निवासस्थानाचं पुढे काय करायचं? यासंदर्भात दिल्ली सरकार नंतर निर्णय घेईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘शीशमहल’ मूळ स्वरूपात आणा – भाजपा आमदार

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे रोहिणी मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार व माजी विरोधी पक्षनेते विजेंदर गुप्ता यांनीही उपराज्यपालांना पत्र लिहून ६, फ्लॅगस्टाफ रोड हे निवासस्थान त्याच्या मूळ स्वरूपात आणण्याची विनंती केली आहे. या निवासस्थानाची पुनर्बांधणी करताना केजरीवाल यांनी आसपासच्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप भाजपानं निवडणूक काळात केला होता. त्यालाच अनुसरून आता ही मागणी करण्यात आली आहे.

“केजरीवाल यांनी या शासकीय निवासस्थानाची पुनर्बांधणी करताना १० हजार चौरस मीटरचं बांधकाम ५० हजार चौरस मीटरपर्यंत वाढवलं. त्यासाठी आसपासच्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केलं. त्यात ४५ व ४७ राजपूर रोडवरील ८ टाईप व्ही फ्लॅट आणि ८ए व ८बी फ्लॅगस्टाफ रोड हे बंगलेही त्यांनी अतिक्रमित केले”, असा आरोप विजेंदर गुप्ता यांनी केला आहे.