भारतात अभिनव उद्यमशीलतेची फार मोठी क्षमता असून जर भारताने आपले पत्ते चांगल्या रितीने खेळले, माहिती तंत्रज्ञानात चांगली धोरणे अंगीकारली व इंटरनेट सुविधा मिळण्याची खात्री निर्माण केली तर पुढचे गुगल भारतात तयार होऊ शकते, असे गुगलचे कार्यकारी अध्यक्ष एरिक श्मिड्ट यांनी  सांगितले.
रिइमॅजिनिंग इंडिया – अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ आशियाज नेक्स्ट सुपरपॉवर या मॅकेन्झी या जागतिक सल्लागार संस्थेने संपादित केलेल्या पुस्तकात लिहिलेल्या लेखात ते म्हणतात की, भारत इंटरनेट क्षेत्रात मागे पडला आहे. तेथील आजचे इंटरनेट हे अमेरिकेतील १९९४ मधल्या इंटरनेटच्या अवस्थेत आहे, त्यावेळी गुगलचा जन्म व्हायचा होता.
ते पुढे म्हणतात की, भारतातील गावे व शहरांमध्ये इंटरनेटची उपलब्धता वाढवली तर तेथील समाज व अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होईल.
गुगलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले श्मिड्ट यांनी सांगितले की, भारतात सर्जनशील मनुष्यबळाची कमी नाही. सिलिकॉन व्हॅलीत ते आम्हाला दिसते आहे. जिथे भारताच्या किमान ४० टक्के उद्योजकांनी कंपन्या सुरू केल्या किंवा तेथे काम केले. जर भारतातील लोकांनी देश न सोडता तेथेच उद्यमशीलतेतील कल्पकता दाखवित काम सुरू केले तर काय होईल याचा विचार करा. ते जग बदलू शकतील. अनेक मोठय़ा इंटरनेट संस्था ते स्थापन करू शकतील व भारतीय ग्राहकांच्या गरजा, रूची, शैली पूर्ण करू शकतील. त्या भारतीय कंपन्यांपैकी एखादी कंपनी तरी जगातील पुढचे गुगल सुरू करू शकेल. आणखी काही वर्षे कदाचित हे घडणार नाही पण जर भारताने नीट विचाराने पावले टाकली तर भारतीय अभियंते, छोटे उद्योजक प्रथम भारतातील अडचणींवर मात करून नंतर अनेक समस्यांची उत्तरे शोधणारी सॉफ्टवेअर निर्यात करू शकतील. एकूण १.२ अब्ज लोकसंख्येपैकी भारतातील ६०० दशलक्ष लोक मोबाईल वापरकर्ते आहेत पण केवळ १५० दशलक्ष लोकांना नियमित इंटरनेट उपलब्ध आहे. २०११ मध्ये भारतात इंटरनेटचा प्रसार ११ टक्के होता जो विकसित देशांपेक्षा फार कमी आहे, जिथे इंटरनेटचा प्रसार हा ७० टक्के आहे. भारतात इंटरनेटचा प्रसार चीनच्या एक तृतीयांशही नाही. चीनमध्ये तो ३९ टक्के आहे. विकसित देशांच्या तुलनेत भारतात इंटरनेटचा प्रसार विकसनशील देशांच्या निम्माही नाही. विकसनशील देशात इंटरनेटचा प्रसार २४ टक्के आहे. त्यामुळे भारत इंटरनेटमध्ये मागे पडत आहे यात शंका नाही. असे असले तरी भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाची प्रतिमा जगात पहिल्या क्रमांकाची आहे. भारतात ब्रॉडबँड वापरकर्त्यांची संख्या २० दशलक्ष आहे, पण कनेक्टीव्हिटीच्या बाबतीत भारत प्रगतीच्या उंबरठय़ावर आहे.