झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील कोचांग गावात बंदुकीच्या धाकावर स्वयंसेवी संस्थेच्या पाच महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थलांतर आणि मानव तस्करी याबद्दल जनजागृती करण्यासाठी पीडित महिला मंगळवारी गावामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी हादरवून सोडणारी ही घटना घडली. बलात्कार झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी पीडित महिलेने एका समाजसेवकाशी संपर्क साधल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला.

या समाजसेवकानेच नंतर पोलिसांना कळवले. पाच ते सहा जणांनी मिळून हे घृणास्पद कृत्य केले. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक केलेली नाही. संशयितांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरु केला आहे असे पोलिसांनी सांगितले. झारखंडच्या कोचांग गावात ही घटना घडली. पोलिसांनी गुरुवारी एफआयआर दाखल केल्यानंतर रांचीचे डीआयजी अमोल व्ही होमकर यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके बनवली आहेत.

सरकारी योजनेचा प्रचार करण्यासाठी परवानगीशिवाय गावात पाऊल ठेऊ नका असे आरोपींनी आपल्याला धमकावले होते असे एका पीडित महिलेने सांगितले. मंगळवारी एनजीओचे पथक गावात मानव तस्करी संबंधी जगजागृती करण्यासाठी एक पथनाटय सादर करत होते. त्यावेळी काही अज्ञात व्यक्ती तिथे आल्या व बंदुकीच्या धाकावर या महिलांना एनजीओच्याच गाडीतून अज्ञात स्थळी घेऊन गेले.

पथनाटयातील पुरुष सहकाऱ्यांना मारहाण करुन त्यांना त्यांचेच मूत्र प्यायला लावले व गाडीत बंद केले. त्यानंतर आरोपी महिलांना घनदाट जंगलात घेऊन गेले व तिथे त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला व या संपूर्ण घृणास्पद कृत्याचे मोबाईल फोनवर चित्रीकरण केले. जवळपास चार तास आम्हाला बंधक बनवून ठेवले होते असे पीडित महिलेने सांगितले.

Story img Loader