NHAI Increses Toll Tax Fees Expressways : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आजपासून टोल दरात पाच टक्क्या पर्यंतची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यातील मतदान पूर्ण होताच आता नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे महाग पडणार आहे. २ जूनच्या मध्यरात्रीपासून देशातील सर्व महामार्गावरील टोल दरात वाढ होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, टोल दरात दरवर्षी वाढ करण्यात येत असते. हा दरवर्षीच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. ही दरवाढ आधीच होणार होती, मात्र आचारसंहितेच्या काळात टोल दरात वाढ करू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. यामुळे टोल दरवाढ निवडणूक काळात रोखण्यात आली होती. आता ३ जून २०२४ पासून टोलच्या दरात ३ ते ५ टक्क्यांपर्यंतची वाढ करण्यात येत आहे. सोमवारपासून देशभरातील १,१०० टोल प्लाझावर टोल दरवाढ होणार आहे.

दूध दरातही वाढ

दरम्यान, निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (जीसीएमएमएफ) अमुल दुधाच्या किंमतीत प्रती लीटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या वाढलेल्या किंमती आजपासून (सोमवार, ३ जून) लागू झाल्या आहेत. जीसीएमएमएफने केलेल्या घोषणेनुसार अमुल दूध दोन रुपयांनी महागले.

अमुलने जाहीर केलेल्या नव्या किंमतींनुसार ‘अमुल गोल्ड’च्या अर्धा लीटरच्या पाऊचसाठी (पिशवी) आता ३२ ऐवजी ३३ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच ग्राहकांना अमुल गोल्डच्या एक लीटर पाऊचसाठी आता ६४ ऐवजी ६६ रुपये खर्च करावे लागणार आहेत. ‘अमुल ताजा’साठी (अर्धा लीटर) २६ ऐवजी २८ रुपये, ‘अमुल शक्ती’साठी (अर्धा लीटर) २९ ऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. दुधाच्या वाढलेल्या किंमतींमुळे सामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nhai increases toll fees on expressways by five percent starting monday kvg