Tahawwur Rana News: २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणा याचे गुरुवारी अमेरिकेकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. तहव्वूर राणाला एका विशेष विमानाने दिल्लीच्या पालम विमानतळावर आणण्यात आले त्यानंतर एनआयएने त्याला औपचारिकपणे अटक केली. गुरुवारी रात्री तहव्वूर राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे एनआयएने २० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने एनआयएला राणाची १८ दिवसांची कोठडी दिली.

तत्पूर्वी, विमान भारतात उतरल्यानंतर, तहव्वूर राणा याला कडक सुरक्षेत विमानतळावरून पटियाला हाऊस कोर्टात आणण्यात आले. त्याला विशेष एनआयए न्यायाधीश चंद्रजीत सिंह यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तहव्वूर राणाची, कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे वकील पीयूष सचदेवा यांनी बाजू मांडली.

एनआयएच्या विशेष न्यायालयात एनआयएचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ वकील दयान कृष्णन आणि विशेष सरकारी वकील नरेंद्र मान यांनी केले. त्याच वेळी, दिल्ली कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे वकील पीयूष सचदेवा यांनी तहव्वूर राणाची बाजू न्यायालयात मांडली. न्यायाधीशांना संपूर्ण प्रकरणाची आणि वैद्यकीय अहवालाची माहितीही देण्यात आली. ताब्यात घेतल्यानंतर, तहव्वूर राणाची आता एनआयए मुख्यालयात चौकशी केली जाणार आहे.

एनआयए मुख्यालयात एक चौकशी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात तपासाशी संबंधित फक्त १२ सदस्यांना प्रवेश असणार आहे. यामध्ये डीजी एनआयए सदानंद दाते, आयजी आशिष बत्रा, डीआयजी जया रॉय यांचा समावेश आहे.

तहव्वूर हुसेन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. राणा २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलमन हेडलीच्या जवळचा आहे. तहव्वूर राणाने यापूर्वी सुमारे १० वर्षे पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले आहे. यानंतर, त्याने नोकरी सोडली आणि भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला. तहव्वूर राणाने पाकिस्तानी दहशतवाद्यांना मुंबईवर हल्ला करण्यास मदत करण्याबरोबर हल्ल्याच्या संपूर्ण नियोजनात त्याचा सहभाग होता.