पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासह देशभरात ४० बॉम्बस्फोट घडवणारा आणि दहशतवादी हल्ल्यांची योजनाबद्ध आखणी करून त्यांची अंमलबजावणी करणारा अत्यंत खतरनाक दहशतवादी यासिन भटकळ याला जेरबंद करण्यात भारतीय गुप्तचर यंत्रणांना यश आले आहे. भारत-नेपाळ सीमेवर बुधवारी रात्री गुप्तचर यंत्रणा व बिहार पोलीस यांच्या संयुक्त पथकाने यासिन व त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर यांना अटक केली. त्यांना आज, शुक्रवारी विशेष विमानाने दिल्लीत आणले जाईल.
पुण्यासह मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद व दिल्ली या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणत शेकडोंच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला यासिन गेल्या पाच वर्षांपासून गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता. दिल्लीत १९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बाटला हाऊस गोळीबार प्रकरणानंतर इंडियन मुजाहिदीनचा हा संस्थापक सदस्य गुप्तचर यंत्रणांच्या नजरेत आला. त्यानंतर यासिन सातत्याने या यंत्रणांना गुंगारा देत नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानात राहत होता.
गेल्या सहा महिन्यांपासून गुप्तचर विभाग यासिनच्या मागावर होता. अखेरीस त्याला बुधवारी नेपाळ सीमेवर जेरबंद करण्यात त्यांना यश आले.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यासिनच्या अटकेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना यासिनच्या अटकेबाबतचा तपशील सादर केला.टुण्डानंतरचे मोठे यश
लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अब्दुल करीम टुण्डानंतर अवघ्या १५ दिवसांतच यासिनला अटक करण्यात गुप्तचर यंत्रणांना यश आले, हे विशेष. टुण्डा व यासिनच्या अटकेमुळे तपासयंत्रणांचे मनोधैर्य वाढले असून अनेक दहशतवादी घटनांचा त्यामुळे उलगडा होणार आहे.
एनआयएकडे ताबा
यासिनच्या अटकेसाठी ३५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि दिल्ली पोलिसांनी दहा लाख तर मुंबई पोलिसांनी यासिनची माहिती देणाऱ्याला १५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. आज, शुक्रवारी यासिनला एनआयएच्या ताब्यात दिले जाणार आहे.
बांगलादेशात जायचे होते
यासिनला नेपाळमार्गे बांगलादेशात जायचे होते. साथीदार असदुल्लाबरोबर तो बांगलादेशात जाऊन तेथे भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट रचणार होता. मात्र, त्यापूर्वीच यासिनला चंपारण जिल्ह्य़ातील नाहर चौक या नेपाळ सीमेला लागून असलेल्या गावात अटक करण्यात आली.
चाळीस स्फोट घडवणारा यासिन जेरबंद
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासह देशभरात ४० बॉम्बस्फोट घडवणारा आणि दहशतवादी हल्ल्यांची योजनाबद्ध आखणी करून त्यांची अंमलबजावणी करणारा
First published on: 30-08-2013 at 05:26 IST
TOPICSयासिन भटकळ
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nia arrests indian mujahideen mastermind yasin bhatkal