नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दोन वर्षांपूर्वीच्या स्फोट प्रकरणात छापे घालण्यात आणि अटक करण्यात आपला दुष्ट हेतू असल्याचा आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी जोरकसपणे फेटाळून लावला. याच प्रकरणात पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात जमावाने ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला केला होता.
डिसेंबर २०२२ मध्ये भूपतीनगर येथे झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले होते. त्या प्रकरणात बलाईचरण मैती व मनोव्रत जना या संशयित सूत्रधारांना शनिवारी अटक करण्यासाठी गेलेल्या ‘एनआयए’च्या पथकावर झालेल्या हल्ल्यात एक अधिकारी जखमी झाला आणि एका वाहनाची मोडतोड करण्यात आली.
‘भूपतीनगर स्फोट प्रकरणात दुष्ट हेतू असल्याचे आरोप ‘एनआयए’ स्पष्टपणे फेटाळून लावत आहे’, असे या यंत्रणेच्या एका प्रवक्त्याने सांगितले. या संपूर्ण वादाचे वर्णन त्याने ‘दुर्दैवी’ असे केले आणि आपल्या पथकावर ‘काहीही कारण नसताना’ हल्ला झाला हे त्याने स्पष्ट केले.
हेही वाचा >>> मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय
‘एनआयए’ व भाजप यांच्यात ‘अपवित्र युती’ असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केल्याच्या काही तासांनंतर ‘एनआयए’ने हे निवेदन जारी केले.
आरोपीच्या पत्नीची अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार
दरम्यान, ‘एनआयए’चे अधिकारी तपास करण्याच्या नावावर भूपतीनगरातील आपल्या घरात घुसले व त्यांनी आपला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार मनोव्रत जना याच्या पत्नीने नोंदवली असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. जना याची पत्नी मोनी हिने भूपतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. अधिकाऱ्यांनी आपल्या घरातील मालमत्तेची नासधूसही केल्याचे तिने या तक्रारीत म्हटले आहे.
मोदी, ममता यांचे आरोप- प्रत्यारोप
जलपायगुडी, कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी रविवारी एकमेकांवर आरोप केले. पश्चिम बंगालमध्ये भ्रष्टाचार व हिंसाचार करण्याचा मुक्त परवाना मिळावा अशी तृणमूल
काँग्रेसची इच्छा असून, त्यामुळेच अशा प्रकरणांचा तपास करणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांवर राज्यात हल्ले केले जात आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. दुसरीकडे, भाजपमध्ये सामील व्हा, अन्यथा कारवाईला तयार राहा असे भाजप तृणमलू काँग्रेसच्या नेत्यांना सांगत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. ईडी, सीबीआय, ‘एनआयए’ व प्राप्तीकर खाते हे भाजपचे ‘हात’ असल्यासारखे वागत आहेत, असे पुरुलिया येथे निवडणूक प्रचार सभेतील भाषणात त्या म्हणाल्या.