उधमपूर येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करताना पकडलेला लष्कर ए तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा अतिरेकी महंमद नावेद याकूब याची सत्यशोधन चाचणी उद्या करण्यात येणार आहे. दिल्ली न्यायालयाने त्याची चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीर मरण आले होते.
नावेद हा विशीतील तरुण असून त्याला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याचे डीएनए गोळा करणे, आवाजाचे नमुने घेणे या गोष्टींनाही राष्ट्रीय सुरक्षा संस्थेला परवानगी देण्यात आली आहे. सध्या नावेद एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात असून त्याची सत्यशोधन चाचणी लोधी रस्त्यावरील सीजीओ संकुलातील केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत उद्या सकाळी अकरा वाजता केली जाणार आहे. यावेळी इन कॅमेरा सुनावणी घेण्यात आली असता जिल्हा न्यायाधीश अमरनाथ यांनी एनआयएची पॉलिग्राफ चाचणीची विनंती मान्य केली. नावेद हा पाकिस्तानातील फैसलाबादचा रहिवासी असून त्याचीही परवानगी चाचणीसाठी घेतली आहे. त्याने उर्दूत लेखी परवानगी दिली आहे. घुसखोरीचा मार्ग व त्याचा काश्मीर खोऱ्यातील इतर लोकांशी संपर्क याविषयी त्याने दिशाभूल करणारी उत्तरे दिल्याने त्याची चाचणी करण्यात येणार आहे. दोन गावकऱ्यांनी व सीमा सुरक्षा दलांनी नावेदला जिवंत ताब्यात घेतले होते. नावेद पाकिस्तानचा नाही असे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी म्हटले तर डीएनएचे नमुनेही पुराव्यासाठी घेण्यात आले आहेत. नावेदला गेल्या आठवडय़ात काही चाचण्यांसाठी जम्मूहून येथे आणण्यात
आले. एनआयएचे प्रमुख शरद कुमार यांनी दोन दिवस जम्मूत नावेदचे जबाब घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा