कल्याणमधील जे तरुण इसिससाठी लढण्याकरिता गेले होते त्यांना फूस लावणाऱ्या अफगाणी उद्योजकांची माहिती आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) घेत आहे. या अफगाणी उद्योजकाचे नाव जाहीर करण्यात आले नसून त्याचा भारतात सुकामेव्याचा व्यवसाय आहे.
कल्याण येथील चार युवकांकडे हा उद्योजक गेला व त्यांनी इसिससाठी लढण्यासाठी मतपरिवर्तन केले. एनआयएने अरीब मजीद याला अटक केल्यानंतर हा उद्योजक आकस्मिकरीत्या बेपत्ता झाला आहे. मजीद याला टर्कीतून गेल्या नोव्हेंबरमध्ये भारतात आणले होते.गेल्या डिसेंबरमध्ये हा अफगाणी नागरिक दिल्लीतून निघून गेला. आता अफगाणिस्तानला गृह मंत्रालयाने त्याला ताब्यात देण्यासाठी विनंती पत्र पाठवले असून ते पत्र सक्षम न्यायालयात या आठवडय़ात सादर करण्यात आले.
 एनआयएने अफगाण सरकारला त्या व्यक्तीचा पत्ता, बँक खाते, त्याचे आखातातील सहकारी, त्याने केलेले फोन याची माहिती दिली आहे. एनआयएने इराकमधून आल्यानंतर मजीदला अटक केली होती त्याच्यावर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा कलम १६,१८, २० अन्वये कारवाई करण्यात आली आहे. भादंविचे १२५ कलमही लावण्यात आले आहे. मजीद हा २८ नोव्हेंबरला मुंबईत आला व तो सहा महिने इराकमध्ये होता नंतर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. गेल्या मे महिन्यात कल्याणचे चार युवक पश्चिम आशियातील धर्मस्थळांना भेट देण्यासाठी जातो असे सांगून बेपत्ता झाले होते. नंतर ते इसिससाठी लढण्याकरिता गेले. अभियांत्रिकीच्या या चारही युवकांना नंतर २३ मे रोजी बगदादमध्ये आणण्यात आले. मजीदन मेल पाठवताना  कुठला इंटरनेट पत्ता वापरला याची माहिती अमेरिकने दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा