गेल्या काही दिवसांपासून देशभरात पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची चर्चा सुरू आहे. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं देशभरातील या संघटनेच्या ठिकाणांवर आणि संबंधित व्यक्तीवर छापेमारी केल्यानंतर ही संघटना चर्चेत आली आहे. मंगळवारी केंद्रीय गृह विभागाने या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी आणण्याची कारवाई केल्यानंतर पुढील तपास करण्यात एनआयएच्या अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात एनआयएनं टाकलेल्या छाप्यांमध्ये असं काय सापडलं की ज्यामुळे या संघटनेवर थेट बंदीची कारवाई करण्यात आली? यावर चर्चा सुरू झाली आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून या छापेमारीत एनआयएच्या हाती काय काय लागलं, यासंदर्भातली माहिती या वृत्तात दिलं आहे.
२२ सप्टेंबर रोजी एनआयए आणि ईडीनं १५ राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाई तब्बल १०५ लोकांना अटक करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी याच कारवाईचा पुढचा टप्पा म्हणून अजून आठ राज्यांमध्ये अशीच छापेमारी करण्यात आली. या छापेमारीमध्ये एनआयए आणि ईडी या तपास यंत्रणांना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या.
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, या छाप्यांमध्ये तपास यंत्रणांना आयईडी कसे बनवावेत? याची माहिती देणारं पुस्तक पीएफआयशी संबंधित मोहम्मद नदीम आणि अहमद बेग नडवी यांच्याकडे सापडलं. ‘सहज उपलब्ध साहित्यातून आयईडी कसे बनवायचे’, अशा आशयाचं या पुस्तकाचं शीर्षक आहे.
विश्लेषण : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर का कारवाई?
यासोबत दोन लॉरेन्स एलएचआर-८० तपास यंत्रणांनी हस्तगत केले आहेत. हे हँडहेल्ड रेडिओ आणि नेव्हिगेटर आहे. सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या रामनाड बाराकथुलामधल्या जिल्हाध्यक्षाकडून हे ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच, बंगळुरूमधला पीएफआयचा नेता शाहीद खान याच्याकडून रोकड जप्त करण्यात आली आहे.
केंद्र सरकारची कारवाई
दरम्यान, एनआयए आणि ईडीच्या छापेमारीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआयवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. त्यासोबतच, रिहॅब इंडिया फाऊंडेशन (RIF), कॅम्पस फ्रंड ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स कौन्सिल, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रंट, ज्युनिअर फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन या संघटनांवरही बंदीची कारवाई करण्यात आली आहे.