जम्मू : जम्मू- काश्मीरच्या राजौरी येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात आला असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगितले. संपूर्ण सुरक्षा जाळे असलेल्या नव्या कृती आराखडय़ासह सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी जम्मू भागातील नागरिकांना दिले.
गाव संरक्षण रक्षक बळकट करण्याचा १ व २ जानेवारीला ढांगरी येथे झालेल्या दुहेरी हल्ल्यांशी काहीही संबंध नाही, कारण या स्वयंसेवकांना सक्षम करण्याचा निर्णय गेल्यावर्षी ऑगस्टमध्येच घेण्यात आला होता, हे शहा यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यांत ७ जण ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. १ जानेवारीला दहशतवाद्यांच्या गोळीबारात ५ जण मारले गेले होते, तर दुसऱ्या दिवशी झालेल्या आयईडीच्या स्फोटात दोन मुलांनी जीव गमावला होता.
केंद्र सरकारने या दोन्ही घटनांशी संबंधित प्रकरणाचा तपास काल एनआयएला सोपवला आहे. गेल्या दीड वर्षांत जम्मू भागात झालेल्या इतर सर्व दहशतवादी घटनांसह या प्रकरणाचा तपास एनआयए व जम्मू पोलीस संयुक्तपणे करतील, असे शहा यांनी सांगितले.