मुस्लीम तरुणांना ‘लष्कर-ए-तोयबा’, ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी फूस लावून भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा ( पीएफआय ) कट होता, असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने केला. त्यापार्श्वभूमीवर १०० च्यावरती पीएफआय कार्यकर्त्यांना एनआयएने अटक केली आहे. यावरून पीएफआय प्रणित असलेल्या एसडीपीआयने एनआयए आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर ( आरएसएस ) हल्लाबोल केला आहे.
सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ( एसडीपीआय ) कर्नाटक सरचिटणीस भास्कर प्रसाद यांनी म्हटलं की, “पीएफआय संघटनेवर छापे म्हणजे अल्पसंख्याक, दलित आणि अन्य समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. एनआयएने आरएसएसच्या संलग्न असलेल्या संघटनांवर देशविरोधी कारवायांसाठी छापे टाकण्याचे धाडसं केलं नाही.”
हेही वाचा – राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग लष्कराच्या नजरकैदेत? चीनमध्ये नेमकं काय घडतयं, जाणून घ्या…
“आरएसएसच्या कार्यालयात शेकडो बंदुका आणि शस्त्रांची पूजा केली जाते. त्याकडे एनआयए डोळेझाक करते. आरएसएस ही नोंदणीकृत नसलेली संघटना आहे. मग ही शस्त्रे कोणाच्या नावावर नोंदणी केली आहेत. या शस्त्रांच्या प्रदर्शनामुळे तपास किंवा छापे पडत नाही,” असा सवाल भास्कर प्रसाद यांनी केला आहे.
हेही वाचा – शशी थरूरांचे ठरले, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, अनेकांचा पाठिंबा असल्याचा दावा
“नोंदणीकृत नसलेली संस्था करोडो रुपयांचे व्यवहार कसे करू शकते? एनआयए आंधळी आहे का?, संघाचे माजी नेते यशवंत शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात देशभरात झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये त्यांचा समावेश असल्याचे नमूद केलं होतं,” असा आरोपही भास्कर प्रसाद यांनी केला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने याबाबतचे वृत्त दिलं आहे.