Nigeria : नायजेरियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पेट्रोल टँकरचा स्फोट होऊन तब्बल ९४ लोकांचा दुर्वेवी मृत्यू झाला आहे, तर ५० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नायजेरियामधील जिगावा राज्यातील माजिया शहराच्या जवळ घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

माहितीनुसार, एक टँकर पेट्रोल घेऊन जात होते. जिगावा राज्यात माजिया शहरामधून हे टँकर पेट्रोल घेऊन जात असताना टँकर चालकाचं अचानक टँकरवरील नियंत्रण सुटलं आणि टँकरचा अपघात झाला. या अपघातात टँकर रसत्यावर उलटले. त्यामुळे टँकरमधील पेट्रोलची मोठ्या प्रमाणात गळती होऊ लागली. हे पाहून त्या ठिकाणी आसपास असणाऱ्या लोकांनी मोठी गर्दी केली. तसेच त्या ठिकाणी आलेल्या लोकांची पेट्रोल गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडाली. मात्र, यावेळी या टँकरचा अचानक स्फोट झाला आणि या स्फोटमध्ये तब्बल ९४ लोकांचा दुर्वेवी मृत्यू झाला. या घटनेमुळे नायजेरियामध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

हेही वाचा : Bomb Threat : बॉम्बने विमान उडवण्याची तीन दिवसातली १२ वी धमकी, भारतात चाललंय काय?

या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, पेट्रोलचा टँकर उलटल्यानंतर त्या टँकरमध्ये मोठा स्फोट झाला. पण त्याचवेळी टँकरमधून पेट्रोल गोळा करण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली होती. मात्र, यावेळी अचानक मोठा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये ९४ लोकांचा मृत्यू झाला, तर ५० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. तसेच जखमी झालेल्या लोकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यामधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर नायजेरियामधील जिगावा राज्यातील माजिया शहरात शोककळा पसरली आहे. या घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्या सर्व मृतांवर एकत्रितपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. हा स्फोट एवढा भीषण होता की, ही घटना घडली त्या ठिकाणी सर्वत्र आग पसरली होती. तसेच या आगीच्या ज्वाळा लांबलाबपर्यंत पसरल्या होत्या. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आगीवर नियंत्रणही मिळवले. मात्र, तोपर्यंत अनेकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.