पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांमध्ये जणू काही मुक्ताफळे उधळण्याची चढाओढ सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज किशोर यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करून अजब तर्कट मांडले आहे. राजीव गांधी यांनी एखाद्या नायजेरियन महिलेशी विवाह केला असता व ती महिला रंगाने गोरी नसती तर काँग्रेसने तिला (अध्यक्षपदी) स्वीकारले असते का, असे वादग्रस्त विधान गिरिराज सिंह यांनी केले आहे. याच मंत्रिमहोदयांनी नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य नसणाऱ्यांनी पाकिस्तानात जा, असे अकलेचे तारे तोडले होते. त्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ माजला होता. आता तर सोनिया गांधी यांच्या वर्णावरून गिरिराज सिंह यांनी विकृत विधान केले आहे. अर्थात त्यांनी सोनिया व राहुल गांधी यांची क्षमा मागितली असली तरी संतप्त काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीदेखील गिरिराज सिंह यांची कानउघाडणी केल्याचे वृत्त आहे. अशी वक्तव्ये करण्याऐवजी कामावर लक्ष द्या, अशा शब्दात जेटली यांनी त्यांना खडसावले आहे.
सोनिया गांधी यांच्याविषयी केलेले विधान ‘ऑफ द रेकॉर्ड’ होते, अशी सारवासारव करून गिरिराज सिंह यांनी अप्रत्यक्षपणे प्रसारमाध्यमांवरच या विधानाचे भडक प्रसारण केल्याचा आरोप केला. राजकीय मुक्ताफळे उधळताना गिरिराज सिंह यांनी राहुल गांधी यांचे दीर्घकाल अज्ञात सुट्टीवर जाणे मलेशियन एअरलाइन्सचे विमान हरवण्यासारखे असल्याचे म्हटले होते. काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांवर टिप्पणी केल्याने गिरिराज सिंह यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटली. गिरिराज सिंह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसच्या माध्यम विभागाचे प्रमुख रणदीप सुर्जेवाला यांनी केली. याच गिरिराज सिंह यांच्या निवासस्थानी दीड कोटी रुपयांची रोकड सापडली होती. त्याविरोधात कारवाई होण्याऐवजी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून मोदींनी त्यांचा सन्मान केला, अशी टीका सुर्जेवाला यांनी केली. काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी गिरिराज सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
आंतरराष्ट्रीय पडसाद
नायजेरियन महिलेचा संदर्भ देऊन गिरिराज सिंह यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळली आहे. नायजेरियाच्या भारतातील उच्चायुक्तांनी गिरिराज सिंह यांनी नायजेरियन नागरिकांची क्षमा मागावी, अशा आशयाचे पत्र केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयास लिहिले आहे. त्यांच्या विधानामुळे आमच्या देशवासीयांच्या भावना दुखावल्याचे उच्चायुक्त ओ.बी. ओकनगार यांनी म्हटले आहे.

मुक्ताफळांची मालिका
साक्षी महाराज, साध्वी निरंजन ज्योती, योगी आदित्यनाथ, गिरिराज सिंह या नेत्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने करून सरकारला अडचणीत आणले आहे. निरंजन ज्योती यांच्या ‘रामजादे व हरामजादे’ वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. निरंजन ज्योती यांनी क्षमा मागितल्यानंतरही विरोधकांचे समाधान न झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये स्पष्टीकरण द्यावे लागले होते. वारंवार कानउघाडणी करूनही भाजप नेत्यांची मुक्ताफळे उधळणे सुरूच आहे.

Story img Loader