वेळेच्या बंधनामुळे गावोगावच्या यात्रांमधील रात्रीचे खेळ बंद

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

निवडणूक आचारसंहितेमुळे जरी उमेदवार आणि प्रचार यांना शिस्त आली असली तरी तिच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे काही व्यवसायांचे धाबे दणाणले आहेत. ‘दहाच्या आत घरात’ असे आचारसंहितेचे बंधन असल्याने गावोगावच्या जत्रेत चालणारे तमाशांचे रात्रीचे खेळ सध्या बंद झाले आहेत. यामुळे चैत्र पाडव्यापासून सुरू होणाऱ्या यात्रांमधील तमाशाचे फड आणि हा व्यवसाय धोक्यात आला आहे.

गावच्या जत्रेत पहिल्या दिवशी ग्रामदैवताची महापूजा, रात्री पारावरचा तमाशा, पहाटे देवाची पालखी, दुसऱ्या दिवशी महाप्रसाद, सायंकाळी कुस्त्यांचा फड, रात्री पुन्हा एखादा कलापथकाचा कार्यक्रम आणि तिसऱ्या दिवशी शर्यती असा भरगच्च कार्यक्रम असतो. यात्रांच्या या नियोजनात तमाशाचे सर्वात जास्त आकर्षण असते. या वर्षीही फेब्रुवारी, मार्चपासूनच अनेक गावांनी आपापल्या यात्रांसाठी लोकनाटय़ं ठरवण्यास सुरुवात केली होती. मात्र आचारसंहितेमुळे रात्री १० नंतरच्या सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदीचे काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली. यातूनच यात्रांमधील या तमाशावरही वेळेची बंधने आली आहेत.

दिवसभर यात्रेतील अन्य कार्यक्रम झाले, की रात्री घरोघरी आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी म्हणून असलेला तमाशा सुरू व्हायलाच १० उजाडतात. जो कार्यक्रम ठरलेल्या वेळेपूर्वी सुरू करणेही शक्य नाही त्यावर यंदा खर्चच कशासाठी करायचा म्हणून अनेक गावांनी ठरलेल्या सुपाऱ्या रद्द केल्या. तर ज्यांनी त्या ठरवल्या नाहीत त्यांनी यंदा तमाशा कार्यक्रमावरच फुली मारली आहे.

महाराष्ट्रात सांगली जिल्ह्य़ातील विटा आणि पुणे जिल्ह्य़ातील नारायणगाव या तमाशा व्यवसायाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. राज्यातील प्रमुख फड मालक इथे आपल्या राहुटय़ा लावतात. या वर्षीही ही बाजारपेठ यात्रांसाठी सज्ज झाली होती. पण आचारसंहितेच्या अंमलबजावणीमुळे सध्या त्यांच्याकडे कुणीही फिरकेनासे झाले आहे. विटय़ातील या तळावर सध्या प्रियांका शिंदे मांडवेकर, सारिकाताई पुरंदावडेकर, पायल सावंत गोतंडीकर, कमल ढालेवाडीकर, शांता-लता पंढरपूरकर, चंद्रकांत विरळीकर, निवृत्ती बगाडे, नंदा सातारकर, प्रणाली वन्ने पडळकर, प्यारनबाई कराडकर, संजय हिवरे पुरंदावडेकर, चैत्राली पायल, बचूराम घाटनांद्रेकर, शीतल बारामतीकर, शारदा नागजकर आदी लोकनाट्य मंडळे डेरेदाखल झाली आहेत. मात्र सध्याच्या आचारसंहितेच्या काळातील नियमाच्या कडक अंमलबजावणीमुळे त्यांच्याकडे कुणीही फिरकेनासे झाले आहे.

फड मालकांना घोर

एके का मालकाने फड उभा करताना कलाकार, हरकामे, वाहने यासाठी लाखो रूपयांची गुंतवणूक केलेली असते. मात्र जर यात्रेचे दिवसच मोकळे गेले तर ही आर्थिक गणिते कशी सुटणार याची चिंता आता त्यांना लागली आहे. काही गावच्या यात्रा कमेटीने २३ एप्रिलचे मतदान झाल्यानंतर कार्यक्रमांचे आयोजन केले असले, तरी पुढे उन्हाळी पावसाचे दिवस असल्याने कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष दिवस कमी मिळणार आहेत. या साऱ्यामुळे यंदाचा हा हंगाम कसा साधायचा याची चिंता फड मालकांना लागली आहे.

झाले काय?

दरवर्षी गुढी पाडवा झाला, की गावोगावच्या यात्रांना सुरूवात होते. चत्र, वैशाख महिन्यात या यात्रा तिथीनुसार साजऱ्या करण्यात येतात. मात्र यंदा लोकसभा निवडणूक या यात्रांच्या काळातच आली असल्याने गावोगावी चालणाऱ्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. यात्रेतील धार्मिक कार्यक्रम वगळता अन्य सर्व कार्यक्रम रात्री दहा पूर्वी संपवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे गावोगावी रंगणारी ही वगनाटय़े यंदा थंडावली असून यामुळे तमाशाच्या फडांचे अर्थशास्त्रच बिघडले आहे.

 

 

Story img Loader