तापमान उणे ६.२ अंश; जलाशय गोठले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीटीआय, श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात बुधवारपासून कडाक्याच्या थंडीचा ‘चिल्लई कलान’ हंगाम सुरू झाला. पहलगामसह अनेक ठिकाणी पारा गोठणबिंदूच्या खाली गेला. पहलगाममध्ये रात्रीचे तापमान उणे ६.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. अधिकाऱ्यांनी सांगितले, की काश्मीरमधील अनेक ठिकाणी कालची रात्र या मोसमातील आतापर्यंतची सर्वात थंड रात्र ठरली. दल सरोवरासह खोऱ्यातील जलाशयांचे पाणी व नळांतील पाणीही गोठले होते.

श्रीनगरमध्ये मंगळवारी रात्रीचे किमान तापमान उणे ४.२ अंश सेल्सिअस होते. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात ‘स्कीईंग’साठी प्रसिद्ध असलेल्या गुलमर्ग येथे पारा उणे ४.६ अंशापर्यंत घसरला. कुपवाडा, काझीगुंड व कोकरनाग येथे अनुक्रमे उणे ४.४, ४.२ आणि २.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. २४ डिसेंबपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच नाताळच्या आसपास काश्मीरच्या काही भागात हलका पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. ‘चिल्लई कलान’ हा सर्वसाधारणपणे ४० दिवसांचा कालावधी असतो. या काळात काश्मीर खोऱ्यात कडाक्याच्या थंडीची लाट असते. तापमानात कमालीची घट होते. या काळात विशेषत: उंच डोंगराळ परिसरात हिमवर्षांवाची दाट शक्यता असते. चिल्लई-कलान ३० जानेवारीला संपणार आहे.  त्यानंतर २० दिवस ‘चिल्लई-खुर्द’ व दहा दिवसांचा ‘चिल्लई बच्चा’चा कालावधी मानला जातो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Night temperature in kashmir chillai kalan season begins in kashmir ysh