Army officers friend gangraped in MP: महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असताना मध्य प्रदेशमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय लष्कराचे दोन प्रशिक्षणार्थी जवान आपल्या मैत्रिणींसह फिरायला गेले असताना त्यांच्याबरोबर सहा जणांच्या टोळक्याने घृणास्पद कृत्य केले. या दोन जवानांना टोळक्याने मारहाण करत त्यांच्या मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला. बुधवारी रात्री मध्य प्रदेशच्या महू-मंडलेश्वर मार्गावर असलेल्या जाम गेट येथे ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा पैकी दोन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलीस उपमहानिरीक्षक निमिष अग्रवाल यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, महू छावणीतील दोन जवान आपल्या मैत्रिणींसह नाईट आऊटसाठी बाहेर पडले होते. आपल्या गाडीत बसलेले असताना यावेळी सहा जणांच्या टोळक्याने त्यांना घेरले आणि त्यांना मारहाण केली. एक जवान आणि महिलेला ताब्यात घेऊन टोळक्याने दुसऱ्या जवानाला त्याच्या मैत्रिणीसह सोडले आणि दहा लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. यानंतर संबंधित जवानाने घटनास्थळावरून बाजूला जात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र रेंज मिळत नसल्यामुळे त्याला थोडे अधिक दूर जावे लागले. फोन करून येईपर्यंत दुसऱ्या जवानाला मारहाण करून त्याच्या मैत्रिणीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा घडला होता.

पोलिसांनी सांगितले की, चारही पीडितांना उपचारासाठी महू शासकीय रुग्णालयात सकाळी ६.३० वाजता दाखल केले असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. इंदूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक हितिका वसल यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितले की, रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन्ही जवान लष्कराच्या फायरींग रेंजनजीक एका निर्जन स्थळी आले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार आरोपींवर दरोडा, लूट, बलात्कार असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे वाचा >> मैत्रिणीकडून गुंगीचे औषध, मित्रांकडून बलात्कार; बदलापुरातील खळबळजनक घटना, आरोपी अटकेत

पोलीस अधीक्षक हितिका वसल पुढे म्हणाल्या, “आम्ही दोन आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी एकावर २०१६ साली लूट केल्याचा गुन्हा दाखल झालेला होता. सहा आरोपी संघटित गुन्हेगारीत अद्याप आढळून आलेले नव्हते. रात्री त्यांनी जवानांना त्यांच्या मैत्रिणीसह पाहिले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. आरोपींपैकी एकाकडे पिस्तुलही होती.” आरोपींनी चारही जणांना घेरल्यानंतर त्यापैकी एका जवानाला त्याच्या मैत्रिणीसह पैसे आणण्यासाठी जायला सांगितले आणि ते गेल्यावर दुसऱ्या जवानाला मारहाण करत त्याच्या मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला.

दुसऱ्या जवानाने आपल्या वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली आणि त्यांनी आम्हाला याबद्दल कळविल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. पोलिसांची गाडी पाहताच आरोपी जंगलात पळून गेले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Night trip gone wrong two army officers assaulted and their female friend gangraped in madhya pradesh kvg