मागील सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील १६ आमदारांच्या अपत्रातेचा मुद्दा आणि सत्तासंघर्षावर आज ( १० जानेवारी ) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. पण, आता ही सुनावणी पुढं ढकलण्यात आली आहे. १४ फेब्रुवारीपासून सलग सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. या प्रकरणावरती बिंदू माधव ठाकरे यांचे सुपूत्र वकील निहार ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
निहार ठाकरे हे शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहे. पुढील सुनावणीबद्दल ‘एबीपी माझा’शी बोलताना निहार ठाकरे म्हणाले, “जे सत्य आहे, त्याचाच विजय होणार आहे. नबाम रेबिया प्रकरणात न्यायालयाने योग्य निर्णय दिला आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्यात आला, म्हणजे त्यांच्यावर आमदारांचा विश्वास नाही, असा अर्थ होतो. त्यामुळे ती व्यक्ती आमदारांना अपात्र करु शकते का? हा मुद्दा आहे.”
“नबाम रेबिया प्रकरणत म्हटलं की, आधी विधानसभा अध्यक्षांनी स्वत:चं बहुमत सिद्ध केलं पाहिजे. मगच ते आमदारांवर अपात्रतेची कारवाई करु शकतात. मात्र, बहुमत सिद्ध न करता आमदारांवर अपत्रातेची कारवाई होऊ शकत नाही, असं नबाम रेबिया प्रकरणात सांगितलं आहे,” असं निहार ठाकरे यांनी म्हटलं.
“सरकार भक्कम असून आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. तसेच, निवडणूक आयोगासमोर कागदपत्र दाखल केली असून, त्यावर आज सुनावणी होणार आहे. बहुमत शिंदे गटाकडे हे सिद्ध करत आहोत. त्याच्यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे,” असेही निहार ठाकरेंनी स्पष्ट केलं.