कॉर्पोरेट मध्यस्थ नीरा राडिया यांच्यासोबतच्या संवादासंदर्भात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आणि सध्याचे अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची चौकशी करण्यात येणार आह़े  गुरुवारी सीबीआयने यासंदर्भात टाटा आणि मिस्त्री यांच्याकडून स्पष्टीकरण मागविल्याचेही सूत्रांकडून कळत़े
दरम्यान, सीबीआयच्या या कार्यवाहीबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे टाटा सन्सच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आह़े  जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत तामिळनाडू शासनाला टाटा मोटर्सकडून पुरविण्यात आलेल्या बस आणि झारखंडमधील लोहखाणीचे टाटा स्टीलला झालेले वाटप या प्रकरणांचा सध्या सीबीआय तपास करीत आह़े  या प्रकरणांत आतापर्यंत सीबीआयने केलेल्या चौकशीत कोणताही गुन्हा घडल्याचे दिसून आलेले नाही़ परंतु, राडिया टेपमध्ये या प्रकरणांचा उल्लेख असल्यामुळे यासंदर्भातील काही गोष्टींबाबत टाटा आणि मिस्त्री यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितल़े  आतापर्यंत या प्रकरणात टीव्ही वाहिन्या आणि मोठय़ा वृत्तपत्र समूहांच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा