गेल्या वर्षी अमेरिकेत एक खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला अटक करण्यात आली होती. गुप्ता याला सोमवारी (१७ जून) न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यावेळी गुप्ताने न्यायालयाला सांगितलं की तो निर्दोष आहे. निखिल गुप्ता याला शुक्रवारी (१४ जून) चेक प्रजासत्ताकवरून अमेरिककडे प्रत्यार्पण केलं होतं. न्यूयॉर्कमध्ये खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकन सरकारच्या विनंतीनंतर चेक प्रजासत्ताकने निखल गुप्ताला अटक केली होती. त्याला गेल्या आठवड्यात अमेरिकेत आणण्यात आलं आणि आज न्याालयासमोर हजर केलं. गुरपतवंतसिंग पन्नूकडे अमेरिकन आणि कॅनडा या दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे.
गुप्ताचे वकील जेफरी चाब्रोवे यांनी सांगितलं की “निखिलला सोमवारी न्यूयॉर्कच्या एका फेडरल न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयासमोर निखिलने सांगितलं की तो निर्दोष आहे.” यापूर्वी निखिल गुप्ताने चेक प्रजास्ताकमधील न्यायालयात याचिका दाखल केली होती की “माझं अमेरिकेकडे प्रत्यार्पण करू नका”. मात्र तिथल्या न्यायालयाने निखिल गुप्ताची याचिका फेटाळली होती.
अमेरिकेने निखिल गुप्तावर आरोप केला आहे की तो अज्ञात भारतीय सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशांनुसार काम करत होता. दुसऱ्या बाजूला, भारतानेही हे आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणाशी भारताचा काहीच संबंध नसल्याची भूमिका परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे. मात्र याप्रकरणी उच्चस्तरीय तपास सुरू केला आहे. गुप्ताचे वकील चाब्रोवे म्हणाले, “अमेरिका आणि भारतासाठी हे एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. मला असं वाटतं की आपण याप्रकरणी संयम बाळगावा, आत्ताच कुठल्याही निष्कर्ष काढू नये. या घटनेची पार्श्वभूमी तपासली जाईल, न्यायालयासमोर सुनावण्या होतील आणि त्यामुळे या प्रकरणावर प्रकाश पडेल. आम्ही पूर्ण ताकदीने निखिलचा बचाव करू. बाहेरून होत असलेला दबाव जुगारून हे प्रकरण पूर्ण न्यायिक प्रक्रियेने हाताळलं जावं यासाठी प्रयत्न करू.”
अमेरिकेच्या फेडरल न्यायालयात चालू असलेल्या या खटल्यात निखिल गुप्तावर आरोप ठेवण्यात आला आहे की निखिलने एका मारेकऱ्याला कामावर ठेवलं होतं. तसेच गुरपतवंतसिंग पन्नूला ठार मारण्यासाठी गुप्ताने त्याला १५,००० डॉलर आगाऊ दिले होते. मात्र गुप्ता यांनी हे आरोप फेटाळले आहेत. गुप्ताने म्हटलं आहे की त्याच्यावर खोटे आरोप ठेवून त्याला या प्रकरणात अडकवलं जातंय.
हे ही वाचा >> बायडेन यांची ट्रम्पविरोधात जाहिरात मोहीम; पहिल्या चर्चेपूर्वी ५० दशलक्ष डॉलर्स खर्च करणार
दरम्यान, एप्रिल २०२४ मध्ये वॉशिंग्टन पोस्टने एक वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यानुसार रिसर्च अँड अॅनालिसिस विंगमधील (R&AW) अधिकारी विक्रम यादव हे गुरपतविंतसिंग पन्नूच्या हत्येच्या कटाचे सूत्रधार होते. वृत्तपत्राने दावा केला होता की, R&AW चे तत्कालीन प्रमुख सामंत गोयल यांनी या मोहिमेला मंजुरी दिली होती.
© IE Online Media Services (P) Ltd