पीटीआय, वॉशिंग्टन

न्यू यॉर्कमधील शीख अतिरेक्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेला भारतीय नागरिक निखिल गुप्ता याचा अमेरिकेच्या न्यायालयात निवाडा होईल, असे अॅटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी सांगितले. देशातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवणे, हे आम्ही सहन करणार नसल्याचेही गारलँड म्हणाले.

‘निक’ नावाने ओळखला जाणाऱ्या ५३ वर्षीय गुप्ताला न्यूयॉर्कमध्ये खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून अमेरिका सरकारच्या विनंतीने ३० जून २०२३ रोजी झेक प्रजासत्ताकमध्ये अटक करण्यात आली. त्याचे १५ जून रोजी अमेरिकेकडे हस्तांतरण झाले. गुप्ताला सोमवारी न्यूयॉर्कमधील फेडरल न्यायालयात हजर करण्यात आले. येथे त्यांनी दोषी नसल्याची कबुली दिली, असे त्याचे वकील जेफ्री चॅब्रो यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“भाजपाला संपूर्ण बहुमत नाकारुन भारतीय जनतेने राजकारण…”, विनय हर्डीकर यांचं परखड मत

गुप्ताला सोमवारी अमेरिकेच्या दंडाधिकारी न्यायाधीश जेम्स एल. कॉट यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण अमेरिकेतील जिल्हा न्यायाधीश व्हिक्टर मॅरेरो यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

अमेरिकन नागरिकांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार न्यायालय सहन करणार नाही, हे गुप्ताच्या हस्तांतरणावरून स्पष्ट होत असल्याचे गारलँड यांनी सोमवारी सांगितले. भारतातील शीख फुटीरतावादी चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल अमेरिकन नागरिकाला लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याच्या कथित कटातील सहभागाबद्दल गुप्ताचा निवाडा अमेरिकन न्यायालयात होईल, असेही ते म्हणाले.