Nikhil Kamath Podcast: झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांच्या डब्ल्यूटीएफ या पॉडकास्टमध्ये नुकतेच न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. यामध्ये पंतप्रधानांनी लक्सन यांनी त्यांचे वैयक्तिक जीवन आणि “उद्योजक आणि कलाकार हे राजकारणाचे भविष्य आहेत का” याबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. यावेळी भारतीय उद्योजकांनी न्यूझीलंडमध्ये का गुंतवणूक करावी याबद्दलही मत मांडले. तसेच त्यांनी पद, कुटुंब आणि नातेसंबंधांवरही भाष्य केले.
यावेळी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन म्हणाले की, “एक देश म्हणून, न्यूझीलंडच्या लोकांचे सामूहिक राहणीमान उंचावण्यासाठी, आम्हाला अधिक परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आम्ही काय आणि किती प्रयत्न करतो हे पाहण्याची गरज आहे.”
न्यूझीलंडमध्ये प्रवेश करण्याची संधी
“न्यूझीलंडमध्ये ज्याला कोणाला गुंतवणूक करायची आहे, तो फक्त भांडवलच नाही, तर ज्ञान आणि कौशल्येही आणू शकतो. या न्यूझीलंडच्या व्यवसायांसाठी मौल्यवान गोष्टी आहेत. आम्ही नुकतेच सक्रिय गुंतवणूकदार व्हिसा सुरू केला आहे. यामुळे तुम्हाला तीन वर्षे न्यूझीलंडमध्ये राहता येईल. न्यूझीलंडमध्ये प्रवेश करण्याची ही एक उत्तम संधी आहे,” असे न्यूझीलंचे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानपद महत्त्वाचे की कुटुंब?
या मुलाखती दरम्यान निखिल कामथ यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना, त्यांनी सोशल मीडिया बायोमध्ये “पंतप्रधान” पदाचा उल्लेख करण्यापूर्वी “पती, वडील, भाऊ आणि मुलगा” याचा उल्लेख का केला आहे असे विचारले. याला उत्तर देताना लिक्सन यांनी, पदापेक्षा कुटुंब जास्त महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
“तुम्ही कोण आहात आणि तुमचे नातेसंबंध कोणाशी आहेत हेच शेवटी जीवनाचे सार आहे. तुमची ओळख एका पदापुरती मर्यादीत नसावी. कधीतरी अशी वेळ येईल, जेव्हा मी न्यूझीलंडचा पंतप्रधान नसेन. त्यामुळे मला वाटते की, फक्त पद ही आपली ओळख नसावी”, अशा शब्दात न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी कामथ यांच्या प्रश्नाला उत्तर दिले.
पंतप्रधान मोदीही झळकले होते निखिल कामथ पॉडकास्टमध्ये
दरम्यान, निखिल कामथ यांच्या पॉडकास्टवर यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही झळकले होते. यावेळी पंतप्रधानांनी विविध विषयांवर भाष्य केले होते. पंतप्रधानांचा हा पॉडकास्ट चांगलाच गाजला होता. निखिल कामथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली ही मुलाखत यूट्युबरवर आतापर्यंत ४० लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे.