नवी दिल्ली : अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा केवळ पराभव केला नाही तर थेट इंग्रजीतून सदस्यत्वाची शपथ घेऊन लोकसभेतील खासदारकीची दमदार सुरुवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुजय विखेंनी नीलेश लंके यांना इंग्रजीतून बोलण्याचे आव्हान दिले होते. त्याला लोकांनी मंगळवारी इंग्रजीतून शपथ घेऊन तगडे प्रत्युत्तर दिले. मी लोकसभेत गेलो तर इंग्रजीतून बोलणार असे मी ठरवले होते. त्यानुसार मी इंग्रजीतून शपथ घेतली असे लंके यांनी सांगितले. लंके यांची इंग्रजीतून झालेली शपथ हा मोठा चर्चेचा विषय ठरला.

लोकसभेतील नवनियुक्त खासदारांना मंगळवारी ही शपथ दिली गेली. सकाळचे सत्र महाराष्ट्रातील खासदारांनी गाजवले. ५ मराठी मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली होती. मंगळवारी ४३ खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली.

हेही वाचा >>> प्रफुल पटेल यांचा मोठा दावा; म्हणाले, “थोडा वेळ जाऊद्या, इंडिया आघाडीतील अनेक लोक…”

संसदेच्या सभागृहाच्या सदस्यपदाची शपथ घेताना विहित नमुन्यातील वाक्ये बोलावी लागतात. पण, एखाद दुसरा अपवाद वगळता राज्यातील खासदारांनी मराठी अस्मितेचे प्रदर्शन केले. शपथ घेतल्यानंतर घोषणाबाजी करणे परंपरेला धरून नसल्याने त्याबद्दल हंगामी अध्यक्ष भर्तृहरी मेहताब यांनी खासदारांना इशारेवजा सूचनाही केली होती. त्याकडे मराठी खासदारांनी पूर्ण दुर्लक्ष केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र नियमाला धरून मराठीमध्ये शपथ घेतली.

हिंगोलीचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार नीलेश बापूराव पाटील आष्टीकर यांनी तर शपथ घेतानाच बाळासाहेब ठाकरे व स्वत:च्या वडिलांचे नाव घेऊन भलताच उत्साह दाखवला होता. त्यामुळे मेहताब यांनी त्यांच्या उत्साहाला आवर घालत पुन्हा शपथ घ्यायला लावली.

गडचिरोलीचे काँग्रेसचे खासदार नामदेव किरसान, नगरचे नीलेश लंके आणि पालघरचे भाजपचे खासदार हेमंत सावरा या तीन खासदारांनी इंग्रजीतून शपथ घेतली. नंदुरबारचे काँग्रेसचे खासदार गोवल पाडवी, रामटेकचे काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे, भंडारा- गोंदियाचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे, अकोल्याचे भाजपचे खासदार अनुप धोत्रे, सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील, भाजपचे सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे या सात खासदारांनी हिंदीतून शपथ घेतली. सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पीयूष गोयल यांनीही हिंदीतून शपथ घेतली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh lanke supriya sule arvind sawant take oath as lok sabha members zws