देशात तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झालं असून नव्या १८ व्या लोकसभेचं अधिवेशनही चालू झालं आहे. अधिवेशनच्या पहिल्या दोन दिवसांत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी अनेक खासदारांनी त्यांच्या मातृभाषेत शपथ घेतली. तर काहींनी इंग्रजीतून शपथ घेतली. ज्या उमेदवाराला इंग्रजी भाषेविषयी डिवचण्यात आलेलं त्याच उमेदवाराचा विजय झाल्यानंतर त्यांनी सभागृहात इंग्रजी भाषेतूनच शपथ घेतली. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निलेश लंकेंच्या या कृतीमुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय. दरम्यान, त्यांनी आता याविषयी त्यांची प्रतिक्रियाही दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
इंग्रजीतून शपथ घेत सुजय विखेंवर केली कुरघोडी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात निलेश लंके यांनी भाजपा उमेदवार सुजय विखे यांचा २८ हजार मतांनी पराभव केला. ही निवडणूक देशभर चर्चेचा विषय बनली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, माजी खासदार सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर शिक्षणावरून टीका केली होती. “निलेश लंके यांनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेईन”, असं विखे पाटील म्हणाले होते. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारकाळात निलेश लंके यांनी सुजय विखेंच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच काही प्रचारफेऱ्यांमध्ये आणि सभांमध्ये इंग्रजी वाक्ये बोलून दाखवली होती. दरम्यान, खासदारकीची शपथ इंग्रजीतून घेत लंके यांनी पुन्हा एकदा विखेंवर कुरघोडी केली आहे.
उत्तर द्यायचं तर असं द्यायचं…
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) June 25, 2024
की अपमान करणाऱ्याच्या ५० पिढ्यांनी नाव लक्षात ठेवलं पाहिजे.@Nilesh_LankeMLA#निलेश_ज्ञानदेव_लंके pic.twitter.com/GHG567pQ7F
शपथविधीनंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, निवडणुकीत माझ्यावर काही आरोप केले. संसदेत गेल्यावर इंग्रजीत बोलावं लागतं. तो मुद्दा गाजला. मला ट्रोल केलं गेलं. त्या मुद्द्याला बगल देण्याकरता मी बोलायचो की संसदेत इंग्रजीत बोलणारा खासदार हवाय की तुमची प्रभावीपणे बाजू मांडणारा हवाय? याचा प्रभाव मतदारांवर पडला. विजयी झाल्यानंतर मी एका मुलाखतीत सांगितलं की संसदेत जेव्हा जाईन तेव्हा पहिलं जे बोलेन ते इंग्रजीत बोलेन. त्यामुळे आज मी शपथ इंग्रजीत घेतली.”
हेही वाचा >> Parliament Session : मराठी नव्हे इंग्रजीत… निलेश लंकेंचा संसदेत पहिला शपथविधी, शेवटी म्हणाले…
इंग्रजीची तयारी कशी केली? असं विचारलं असता ते म्हणाले, “तयारी करायला एवढं अवघड काय नसतं. कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. पाण्यात पडल्यावर माणूस पोहोतो. इंग्रजीत शपथ घ्यायची होती, ती घेऊन टाकली. माझंही शिक्षण आहेच ना.”
तुमच्या इंग्रजीतील शपथविधी म्हणजे सुजय विखे यांना उत्तर आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, “उत्तर नाही म्हणता येणार. विषय सोडून द्यायचा. आता जोमाने कामाला लागायचं. लोकांचं एवढं मोठं कर्ज डोक्यावर आहे. लोकांचं काम करायचं. लोकांना रिजल्ट द्यायचा”, असंही ते म्हणाले.