बिहारमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील वनविभागाने जवळजवळ ३०० नीलगायींना ठार केले आहे. काही नीलगायींना चक्क जमीनीत जिवंत पुरण्यात आलं आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नीलगायी शेतात शिरून शेतीचे नुकसान करीत असल्याची तक्रार वन विभागाकडे केली होती. या नीलगायींचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने चक्क शिकाऱ्यांचीच नीलगायी मारण्यासाठी मदत घेतली. वन विभागाने जवळजवळ ३०० नीलगायी मारल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. यापैकी काही नीलगायींना तर चक्क जेसीबीच्या मदतीने जमीनीत जिवंत पुरण्यात आले. खड्डे खोदून जेसीबीच्या मदतीने त्यामध्ये नीलगायींना ढकलल्यानंतर त्यांच्यावर माती टाकून त्यांना जिवंत पुरले. वन विभागाने केलेल्या या धक्कादायक कारवाईचे व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.

बिहारमध्ये सत्तेत असणाऱ्या नितीश कुमार यांच्याच जनता दल युनायटेड (जेडीयू) आमदार असणाऱ्या राज किशोर सिंग यांच्याकडे स्थानिकांनी नीलगायी शेताचे नुकसान करत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सिंग यांनी स्थानिक प्रशासन आणि वन विभागाच्या मदतीने या नीलगायींचा बंदोबस्त लावण्यासाठी शिकाऱ्यांची मदत घेतल्याची माहिती ‘डीएनए’ने दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्स अॅपवरुन व्हायरल झाला. त्यानंतर या व्हायरल व्हिडिओची सत्यता काय आहे असा प्रतीसवाल करत सिंग यांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला आहे.

हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींनी वन विभागावर टीकेची झोड उठवली आहे. जिवंत नीलगायींना खड्ड्यांमध्ये पुरण्याचा हा प्रकार अमानुषपणा असल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वैशालीचे पोलीस अधीक्षक मनवीत सिंग धिल्लोन यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची सत्यता तपासून पाहण्याबरोबरच घडलेल्या घटनेसंदर्भात वन खात्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे आदेश मनवीत यांनी दिले आहेत. नीलगायींना जिवंत पुरणाच्या या प्रकरणात कोणी दोषी अढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास मनवीत यांनी सांगितले आहे.