बुर्ला येथील शासकीय व्हीएसएस वैद्यकिय रुग्णालयात २४ तासांत नऊ नवजात बालकांचा मृत्यू झाला असल्याने याबाबत चौकशीचे आदेश ओदिशा सरकारने दिले आहेत. या नऊ बालकांना शनिवारी सकाळपासून रुग्णालयाच्या दक्षता विभागात ठेवण्यात आले होते. ही मुले वेळेपूर्वी (अकाली) जन्माला आल्यामुळे त्यांना ‘इन्क्यूबेटर’मध्ये ठेवण्यात आल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.लक्ष्मीकांत दश यांनी सांगितले. ही मुले जन्मापासून अशक्त, रक्तहीन आणि कमी वजनाची होती. तसेच, त्यांना श्वसनक्रियेतही समस्या येत होती. यातील एका बालकाचे वजन ५६० ग्रॅम होते, त्याचा अल्प कालावधीत मृत्यू होणे हा केवळ योगायोग आहे. तथापि, यास गंभीररित्या बघितले जात असून बालरोग विभागप्रमुखास याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे, असेही दश म्हणाले. यात रुग्णालयाचा निष्काळजीपणा असल्याचे डॉक्टरांनी नाकारले आहे.
आरोग्य मंत्री दामोदर रुत म्हणाले की. संचालक वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण आणि शिशुभवन संचालक यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. प्राथमिक अहवालात ही मुले जन्मापासून आजारी असल्याचे नमुद करण्यात आले आहे. मात्र, यामागचे सत्य चौकशीनंतरच कळेल असेही ते म्हणाले.
नवजात मुलांचे पालक व नातेवाईक रुग्णालयाच्या अधिका-यांना जबाबदार धरत असल्यामुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, या प्रकरणात रुग्णालयाचा निष्काळजीपणा असल्याच्या आरोपाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुर्ला येथे निदर्शने केली.

Story img Loader