Uttar Pradesh Serial Killer Arrested : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात मागच्या १४ महिन्यात नऊ महिलांचा खून झाल्यानंतर या परिसरात अज्ञात सीरियल किलरची दहशत पसरली होती. मागच्या वर्षी जून महिन्यात पहिला खून झाल्यानंतर नुकताच ३ जुलै रोजी नववा खून झाला होता. नववा खून झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तसेच तीन संशयित आरोपींची स्केच प्रसारित करून आरोपीचा कसून शोध सुरू केला होता. त्यानंतर अखेर आज या आरोपीला अटक करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

आज (दि. ९ ऑगस्ट) पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. आरोपीचे नाव कुलदीप असून तो बरेलीच्या नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आहे. तीन दिवसांपूर्वी तीन संशयित आरोपींचे स्केच जाहीर केल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले होते की, सर्व पीडित महिला या ४५ ते ५५ या वयोगटातील होत्या. पीडित महिलांचा त्यांच्याच साडीने गळा दाबून खून झाला असून त्यांच्या शरीरावरील कपडे इतरत्र विखुरलेले पाहायला मिळाले होते. मात्र कुणावरही लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून आले नाही. सर्व हत्यांची पद्धत जवळपास सारखीच असल्यामुळे पोलिसांनी सीरियल किलर असण्याची शक्यता नाकारलेली नव्हती.

UP serial killer sketch viral
उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन संशयिताचे स्केच प्रसारित केले आहे.

दरम्यान, गुरूवारी राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेऊन उत्तर प्रदेश पोलिसांकडून आतापर्यंत केलेल्या कार्यवाहिचा अहवाल मागितला होता.

पोलिसांनी ९० गावांमध्ये चौकशी केल्यानंतर तीन संशयितांचे स्केच प्रसारित केले होते. या गुन्ह्यांची सुरुवात मागच्या वर्षी जून महिन्यात झाली. तेव्हा पहिल्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर आता नववा मृतदेह ३ जुलै रोजी आढळून आला. सर्व हत्यांमध्ये जवळपास सारखीच पद्धत होती. दुपारच्या सुमारास गळा दाबून खून करण्यात आला असून मृतदेह शेतात टाकण्यात आले होते.

तीन जणांना अटक मात्र तरीही बाहेर खून

पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली होती. मात्र ते तिघे खरे गुन्हेगार नसावेत, असा तपास यंत्रणांना संशय आला. कारण ते तुरूंगात असतानाही बाहेर हत्या झालेल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा नव्याने चौकशी करून प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे नवे स्केच बनवून ते प्रसारित केले होते.

Story img Loader