निपा विषाणूचा संसर्ग केरळमध्ये वाढत असून आज पुन्हा एका बाधिताची नोंद झाली आहे. त्यामुळे केरळमध्ये निपा बाधितांची एकूण संख्या सहा झाली आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून चौघांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये एक नऊ वर्षांचा मुलगाही आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
नव्याने बाधित झालेला रुग्ण ३९ वर्षीय असून त्याच्यावर कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी संशयित रुग्णांची चाचणी केली होती. या संशयित ११ बाधितांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. निरीक्षणाखाली असलेल्या रुग्णांची संख्या ९५० वर पोहोचली आहे. त्यापैकी २३१ रुग्ण अतिजोखमीच्या श्रेणीतील असून २१ रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा >> “न्यायाधीशांना ते तटस्थ आहेत असं वाटतं, मात्र…”; माजी न्यायमूर्ती मुरलीधर यांचे वक्तव्य
दरम्यान, राज्य सरकारने कोझिकोड जिल्ह्यात प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत. तसंच, नऊ पंचायती कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून तिथे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोझिकोड जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था शनिवारपर्यंत बंद राहणार असून २४ सप्टेंबरपर्यंत सर्व मेळावे व कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने कोझिकोड येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ७५ आयसोलेशन रूम, सहा आयसीयू आणि चार व्हेंटिलेटर तैनात केले आहेत.
पुण्यातील ही संस्था करतेय मदत
निपा विषाणूची चाचणी जलद गतीने व्हावी याकरता पुण्यातील National Institute of Virologyने कोझिकोड येथे बायो-सेफ्टी लेव्हल-३ सुविधा असलेली मोबाईल लॅब आणली आहे. दिल्लीतील नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे सहा सदस्यीय पथक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोझिकोडला पोहोचले आहेत.