निपा विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यासह आसपासच्या भागात निपा या घातक विषाणूचा उद्रेक पाहायला मिळत आहे. केरळमध्ये निपाची बाधा होऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सहा संशयित प्रकरणं आढळली आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासमोर निपा विषाणूचं नवं संकट उभं राहिलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र आणि केरळ राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणांनी सावधानता बाळगत प्रतिबंधक उपाययोजनांसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी संशयित रुग्णांचे नमुने गोळा करत आहेत. हे नमुने तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे (NIV) पाठवले जात आहेत.
दरम्यान, निपा विषाणूची लागण झालेल्या लोकांमधील मृत्यूचं प्रमाण हे करोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा जास्त असल्याचं मत तज्ज्ञांनी मांडलं आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) प्रमुख डॉ. राजीव बहल म्हणाले, निपा विषाणूचा डेथ रेट (Mortality rate – मृत्यूचं प्रमाण) हा करोना विषाणूपेक्षा खूप जास्त आहे. निपा विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण ४० ते ७० टक्के इतकं आहे. तर करोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण २ ते ३ टक्के होतं.
दरम्यान, निपाग्रस्तांवरील उपचारांसाठी भारत ऑस्ट्रेलियाहून मोनोक्लोनल अँटीबॉडीचे डोस मागवणार आहे. तसेच हा आजार पसरू नये आणि सध्या ज्यांना निपाची लागण झाली आहे त्यांच्यावरील उपचारांसाठी त्यावर परिणामकारक लस विकसित करण्याचं काम लवकरच सुरू केलं जाईल असंही डॉ. बहल यांनी सांगितलं.
हे ही वाचा >> “डेंग्यूसारखाच सनातन धर्मही….”, उदयनिधींच्या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून पहिल्यांदाच भाष्य
केरळमध्ये २०१८ पासून चौथ्यांदा निपा विषाणूची साथ आली आहे. आधीच्या निपाच्या साथीच्या वेळी आलेला अनुभव आणि त्यानंतर दोन वर्षे करोना संकटाच्या काळातील आव्हाने यामुळे केरळ सरकार आता तातडीने पावलं उचलत आहे. यामुळे निपाची रुग्णसंख्या सध्या तरी मर्यादित दिसत आहे. केरळमध्ये निपामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण सहा जणांना आतापर्यंत संसर्ग झाला आहे. निपाचा हा प्रकार बांगलादेशातील आहे.