करोनानंतर केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. केरळच्या कोझीकोड जिल्ह्यात ३ सप्टेंबर रोजी एका १२ वर्षाच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, या मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे. बाधित मुलाच्या शरीरातून नमुने घेण्यात आले होते. जे पुण्यातील राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था (NIV) येथे पाठवण्यात आले. त्यानंतर मुलाला निपाह विषाणूची व्हायरसची लागण झाल्याते स्पष्ट झाले होते.
केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी आपली एक टीम केरळमध्ये पाठवली आहे. केरळमध्ये निपाह व्हायरस रोगाचा पहिला रुग्ण १९ मे २०१८ रोजी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात आढळला होता. १ जून २०१८ पर्यंत राज्यात १८ रुग्ण आढळले होते. तर या संसर्गामुळे १७ जणांचा मृत्यू झाला होता. जेव्हा निपाह विषाणूने प्रथम केरळमध्ये थैमान घातले तेव्हा संपूर्ण जगाच्या नजरा केरळकडे होत्या.
A suspected case of Nipah virus, a 12-year-old who presented with features of encephalitis and myocarditis was reported on September 3 from Kozhikode district in Kerala. The boy was hospitalised and passed away today morning: Govt of India
— ANI (@ANI) September 5, 2021
आरोग्य मंत्री म्हणाले, ‘दुर्दैवाने मुलाचा पहाटे ५ वाजता मृत्यू झाला आहे. काल रात्री मुलाची प्रकृती अत्यंत नाजूक होती. आम्ही काल रात्री अनेक पथके तयार केली आहेत ते मुलाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. मुलाच्या संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरणात ठेवण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
हेही वाचा – करोनानंतर निपाह व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री : जाणून घ्या कशी होते लागण, लक्षणे आणि त्यावरील उपचारांबद्दल
केरळमध्ये करोनाचा हाहाकार सुरुच आहे. शनिवारी केरळमध्ये २९,६८२ लोक करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि पॉझिटिव्ह दर १७.५४ टक्के नोंदवला गेला आहे. राज्यात एकूण सक्रिय प्रकरणे २ लाख ५० हजार ६५ आहेत. या कालावधीत, राज्यात कोविडमुळे १४२ लोकांचा मृत्यू झाला आहे.