Kerala Nipah Virus : केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात निपा विषाणूची लागण झालेल्या १४ वर्षीय मुलाचा कोझिकोड येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला आहे. यानंतर केरळमधील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. निपा विषाणूमुळे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाला १० दिवसांपासून ताप होता. शुक्रवारी (१९ जुलै) रोजी त्याला अतिदक्षता कक्षात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

मृत मुलाच्या तपासणीचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठविण्यात आले होते. सदर मुलाला निपा विषाणूची लागण झाल्याचे संस्थेने सांगितल्यानंतर त्याची रवानगी कोझिकोड येथील सरकारी रुग्णालयात करण्यात आली होती. सदर मुलावर उपचार करण्यासाठी लागणारे मोनोक्लोनल अँटीबॉडीज हे औषध पुण्यातून कोझिकोड येथे पाठविण्यात आले. मात्र त्याआधीच सदर रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता निपा विषाणूच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मृत मुलावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

हे वाचा >> केरळमध्ये पुन्हा निपा विषाणूचा उद्रेक! हा विषाणू कसा पसरतोय? जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय…

या घटनेनंतर आरोग्य विभागाने मलप्पुरम जिल्ह्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी मास्क परिधान करावा, तसेच प्रादुर्भावाचा संशय असलेल्या ठिकाणी तात्पुरता लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, आणखी चार लोकांमध्ये निपा विषाणूचा प्रादुर्भाव असल्याचे लक्षण दिसून आले आहेत. त्यापैकी एकाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. मृत मुलाच्या संपर्कात आलेल्या जवळपास २४० लोकांवर वैद्यकीय कक्ष नजर ठेवून आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी वेळोवेळी करण्यात येत आहे.

केरळमध्ये वारंवार निपा विषाणूचा उद्रेक

केरळमध्ये २०१८ पासून आतापर्यंत पाच वेळा निपा विषाणूचा उद्रेक झालेला आहे. प्रादुर्भाव झालेल्यांपैकी फक्त सहा जणांचा जीव वाचला आहे. तर १८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

निपा विषाणू म्हणजे काय?

निपा हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे; जो प्रामुख्याने वटवाघूळ, डुक्कर, कुत्रे व घोडे या प्राण्यांना प्रभावित करतो. हा जुनोटिक प्रकारचा विषाणू असल्याने तो संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या माणसाला संक्रमित करू शकतो. त्यानंतर माणसांकडून माणसांमध्येही त्याचा प्रसार होत आहे.

हे ही वाचा >> Health Special: निपा फैलावतोय, घाबरू नका पण अशी काळजी घ्या

निपा विषाणूची लक्षणे कोणती?

१) तीव्र ताप

२) डोकेदुखी

३) श्वास घेण्यास त्रास होणे.

४) खोकला आणि घसा खवखवणे.

५) अतिसार

६) उलट्या होणे.

७) स्नायू दुखणे आणि तीव्र कमजोरी

८) आजाराची तीव्रता वाढल्यास एन्सेफेलायटिससारख्या विकारांची लागण होते.

९) हा विषाणू मज्जासंस्था आणि मेंदूवरही आघात करतो

Story img Loader