सुप्रीम कोर्टात रात्री अडीच वाजता सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत निर्भयाच्या दोषींची फाशी पुढे ढकलण्यासंबंधीची याचिका फेटाळण्यात आली. हा निर्णय ऐतिहासिक ठरला यात काहीही शंका नाही. मात्र या निर्णयामुळे देशाला आठवण झाली ती याकूब मेमनच्या फाशीच्या वेळी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे कसे उघडले होते त्याची.
काय घडलं होतं तेव्हा?
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमन याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली. त्यानंतर ३० जुलै २०१५ रोजी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे रात्री उघडले गेले होते. वकील प्रशांत भूषण आणि इतरांनी याकूब मेमनची फाशी टळावी म्हणून कोर्टात दाद मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली आणि त्याच पहाटे याकूबला फाशी देण्यात आली.
गुरुवारी रात्री अडीचच्या सुमारास रात्री सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडले गेले. कारण निर्भया प्रकरणातील दोषींच्या वकिलांनी म्हणजेच ए.पी. सिंग यांनी दिल्ली कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात दाद मागितली. रात्री अडीच च्या सुमारास कोर्टात सुनावणी घेण्यात आली. यामध्ये सिंग यांनी पवन कुमार हा गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसंच सगळ्या आरोपींची फाशी टळावी म्हणूनही प्रयत्न केले. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांचा कोणताही युक्तीवाद ऐकून न घेता पहाटे साडेपाच वाजताची फाशी कायम ठेवली.
या निर्णयानंतर निर्भयाच्या आईनेही समाधान व्यक्त केलं आहे. अखेर माझ्या मुलीला न्याय मिळाला असं निर्भयाच्या आईने म्हटलं आहे. तसंच कोर्टाबाहेर आल्यानंतर व्हिक्टरीचे चिन्ह बोटांनी दाखवून निर्णय बदलला नाही याचं समाधानही व्यक्त केलं आहे.
आणखी वाचा- निर्भया प्रकरण: आत्तापर्यंत तीन वेळा टळली होती दोषींची फाशी
कर्नाटक राजकीय प्रकरणातही रात्री उघडलं होतं सुप्रीम कोर्ट
निर्भया आणि याकूब मेमन प्रकरणात ज्याप्रमाणे कोर्ट रात्री उघडलं गेलं तसंच कर्नाटकच्या राजकीय पेच प्रसंगातही रात्री सुप्रीम कोर्ट उघडण्यात आलं होतं. १७ मे २०१८ रोजी रात्री दोन वाजता सुप्रीम कोर्ट उघडण्यात आलं आणि राजकीय पेचप्रसंगावर पहाटे पाचपर्यंत सुनावणी सुरु होती.