निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात आता चारही आरोपींना पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात येण्याआधी रात्रभर नाट्यमय घडामोडी सुरु होत्या. फाशी टळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आरोपींनी प्रयत्न केले. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास दोषींची याचिका फेटाळून लावली. या निकालानंतर निर्भयाच्या दोषींना काही तासाच फाशी देण्यात आली. मात्र हा निकाल लागल्यानंतर निर्भायाच्या आईने आनंद व्यक्त केला. २० मार्चचा दिवस निर्भया दिवस म्हणून साजरा केला जाईल. यापुढे आपण देशातील इतर मुलींसाठी आपला संघर्ष कायम ठेवणार आहोत असं निर्भायाचे आईने स्पष्ट केलं.
आणखी वाचा- निर्भया प्रकरण: जाणून घ्या ७ वर्षे ३ महिने ३ दिवसात नेमकं काय काय घडलं?
न्यायालयाने आरोपींची याचिका फेटाळून लावल्यानंतर न्यायालयाबाहेर आल्यावर निर्भयाच्या आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “आज आमच्यासाठी मोठा दिवस आहे. आज महिलांच्या सुरक्षेचा आणि न्यायाचा दिवस आहे. आजचा दिवस न्यायदिवस म्हणून ओळखला जाईल. आज माझ्या मुलीला न्याय मिळाला. आजचा दिवस हा महिलांचा आहे. उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला. यासाठी सर्वांचे आभार. न्यायव्यवस्थेचेही आभार मानते,” अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने नोंदवली. ज्या प्रकारे त्यांची फाशी पुढे ढकलली गेली त्यातून न्यायव्यस्थेतील कमतरता दिसून आली. परंतु आम्हाला न्याय मिळाला, न्यायव्यवस्थेवर विश्वास कायम राहिल, असंही निर्भयाची आई म्हणाली.
आणखी वाचा- निर्भया प्रकरण: शेवटची इच्छा काय?; तुरुंग प्रशासनाच्या प्रश्नावर आरोपी म्हणाले…
न्यायलयाने आरोपींच्या वकिलांना झापलं
आरोपींचे वकील ए.पी. सिंग यांनाही न्यायलयाने झापलं आहे. तुम्ही जे काही दावे करत आहात आणि जी याचिका दाखल केली आहे त्याला काहीही अर्थ नाही असं न्यायलयाने म्हटलं . तसंच आम्ही रात्रीचे १० वाजून गेले आहेत तरी इथे बसलो आहोत. आता तुम्हाला आणखी काय सांगायचं आहे ते सांगा मात्र त्यात काहीतरी तथ्य हवं असं म्हणत न्यायलयाने याचिका करणाऱ्या सिंग यांच्यावर ताशेरे ओढले.